महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात ठिणगीप्रमाणे पडलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चर्चेत आला. कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी प्रश्नांची सरबत्ती केलीये. त्यामुळे वाद आणखी चिघळणाची चिन्ह दिसत आहे.
ADVERTISEMENT
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चर्चेत आला. परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्यानंतर कर्नाटक सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. इतकंच नाही, तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या त्या ट्विटवर भाष्य केलं.
‘आम्ही त्या मुख्यमंत्र्यांना समोरासमोर सांगितलं की, तुम्ही ट्विट करताहेत, ते ट्विट चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं की, ते ट्विट आमचं नाहीये. त्याचीही माहिती त्यांना मिळाली आहे. त्याची माहिती सभागृहात मिळेल. त्या ट्विटमागे कुठला पक्ष आहे, याचीही माहिती मिळेल’, असं सांगत एकनाथ शिंदे विरोधकांवर हल्ला चढवला.
‘आमच्याकडे पोलिसांकडून माहिती आलीये’, एकनाथ शिंदे भडकले, विरोधकांना सुनावलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अशोक चव्हाणांचे सवाल
मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व माहिती सभागृहात देणार असल्याचं म्हटल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काही सवाल उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी केलीये.
‘कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून केलेल्या चिथावणीखोर ट्वीट्सबाबत महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असून, या गंभीर प्रकरणावर राज्य सरकार गप्प का आहे?’ असा सवाल अशोक चव्हाण यांनी शिंदेंना केलाय.
शिंदे गटाच्या खासदारासाठी अजित पवार उतरले मैदानात; विधानसभेत घेतली बाजू
‘बोम्मई यांनी केलेल्या ट्विट्सची भाषा आक्षेपार्ह होती. त्यावर प्रक्षोभ उडाल्यानंतर ते ट्वीटर हँडलच फेक असल्याचा खुलासा करण्यात आला. परंतु, बोम्मई यांचे ते ट्विटर हँडल जानेवारी २०१५ पासून सक्रिय आहे. ट्वीटरने त्याला व्हेरिफाय देखील केले आहे. त्या हँडलवर अजूनही कर्नाटक सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या शासकीय निर्णयांची माहिती दिली जाते आहे. ते ट्विटर हँडल फेक असेल तर मग आतापर्यंत महाराष्ट्राबाबतचे ते आक्षेपार्ह ट्वीट डिलीट का करण्यात आले नाहीत? ते अकाऊंट अजूनही सक्रिय कसे आहे?’, असे प्रश्न चव्हाणांनी उपस्थित केले आहेत.
‘सीमावाद पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतली व सामोपचाराचा सल्ला दिला. पण महाराष्ट्राची भूमिका नेहमीच सामंजस्याची राहिली आहे. चिथावणी देण्याचे काम तर कर्नाटककडून सुरू आहे. तेथील मुख्यमंत्री चिथावणीखोर भाषा वापरतात. तरीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात नाही’, असं म्हणत चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केलाय.
Nagpur: ‘हे’ आहे शिंदे-फडणवीसांचं टार्गेट, नागपूर अधिवेशनातून काय लागणार हाती?
‘त्या वादग्रस्त ट्वीटचे प्रकरण दाबण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रयत्नांना जणू महाराष्ट्र सरकारही मदत करते आहे. राज्यातील सरकारने याबाबत नरमाईची आणि बोटचेपी भूमिका का घेतली आहे? याचे उत्तर महाराष्ट्राला मिळाले पाहिजे’, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली आहे. अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर वाद गाजण्याची चिन्हं दिसत आहे.
ADVERTISEMENT