व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्यात प्रशासन व पोलिसांच्या विरोधात नक्षली सतत दुष्प्रचार करत असतात. हा दुष्प्रचार कुमारवयातील मुलांपासून ते युवकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचविला जातो. यातूनच नक्षलवाद्यांना तरुणांची नवी रसद मिळत असते.
ADVERTISEMENT
या दुष्प्रचाराचा सामना करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आता नवे अनोखे अभियान सुरू केले आहे. यात ‘गडचिरोली फाईल्स’ या नावाने डिजिटल स्केचेस तयार केली जात आहेत. लहान मुलांच्या कॉमिक्ससारख्या गोष्टींच्या माध्यमातून विविध संदेश प्रसारित केले जात आहेत.
स्थानिक गोंडी-मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेत दर पंधरवड्याला एक विषय हाती घेत त्यावर ही स्केचेस बनविली जाणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील हिंसक नक्षल चळवळीची सत्यस्थिती, त्याचे दुष्परिणाम जिल्ह्यातील विकास कामे- शासनाच्या विविध योजना अशा विविध विषयांवर या पुढच्या काळात या लक्षवेधी डिजिटल स्केचेस तयार केल्या जाणार आहेत.
‘या मालिकेतील पहिल्या फाईलमध्ये एका लहान मुलाला नक्षली चळवळीत सामील होण्यासाठी नक्षली धमकावताना दाखविला आहे. विद्यार्थ्याने यासाठी नकार दिल्यावर ‘लाल सलाम’ अशी घोषणा देत नक्षली शाळा हातबॉम्बने उडविताना दाखविण्यात आलं आहे.’
नक्षलवादी बनण्याआधी मिलिंद तेलतुंबडे नेमकं काय करायचा?
नक्षल दलामध्ये लहान मुलांना दाखल करून घेण्यासाठी ‘बालसंगम’ सारखे उपक्रम राबवितात. याच काळात बालके चळवळीकडे ओढली जातात. नेमकी ही रसद तोडणे व रंजक पद्धतीने नेमकी माहिती व नक्षलवादाचा खरा चेहरा जनतेपुढे आणणे यासाठी गडचिरोली फाईल्स कार्यरत असेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नक्षलवादी भागातील तरुणांना पोलिसांच्या मदतीने मिळणार नोकऱ्या
गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्क्यांहून अधिक भागात जंगल आहे. इथली माणसं पावसावर आधारित शेती, आणि जंगलातून मिळणाऱ्या वस्तूंवर गुजराण करतात. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे रोजगाराच्या संधी फारशा नाहीतच. भरकटलेल्या तरुणांकडे मग नक्षल दल हाच पर्याय असतो. पोलिसांनी सिव्हीक एक्शन प्रोग्रामनंतर राबविलेल्या अभियानाच्या माध्यमातून या समस्येचं मूळ ओळखलं. त्यानंतर आता प्रथम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना मदत करण्यासाठी पाऊलं उचलण्यात आलं आहे.
युवक-युवतींना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पोलिसांच्या ‘रोजगार app’ वर नोंदणी करण्यात आली. नोंदणी केलेल्या युवक-युवतींना वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांनंतर नोकरीची संधी उपलबद्ध करुन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील युवक-युवतींची निवड करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT