वसंत मोरे, बारामती
ADVERTISEMENT
वडिलांशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने बहिण-भावाने मिळून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये उघडकीस आली. एवढेच नाही तर खुनाचा गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी मृत महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनावही आरोपी भाऊ-बहीणने रचला होता.
दरम्यान, पोलिसांनी अतिशय चाणाक्षपणे आणि सखोल तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी आरोपी बहीण आणि भावाविरुद्ध तब्बल 22 दिवसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश प्रमोद फडतरे आणि अनुजा प्रमोद फडतरे (रा. नगर, जि. बारामती) या दोन भावंडांना अटक केली आहे. याप्रकरणी सुनील रामदास पवार (रा. पवारवस्ती, शारदानगर, मालेगाव खुर्द) या डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे.
प्रत्यक्षात 11 नोव्हेंबर रोजी बारामतीच्या कसबा परिसरात एका महिलेची हत्या झाली होती. मात्र, त्या महिलेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मृताचे नातेवाईक सांगत होते. असे असले तरी या हत्येची चर्चा परिसरात जोरदार सुरू होती.
गेल्या 12 दिवसांपासून पोलिसांनी वेगवेगळ्या लोकांना भेटून तपास केला असता महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी मुंबई Tak ला सांगितले की, आरोपी ऋषिकेश याचे वडील प्रमोद फडतरे यांचे आणि एका महिलेचे गेल्या काही वर्षांपासून संबंध होते.
दोघांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती होती. या गोष्टीला दोन्ही कुटुंबाकडून जोरदार विरोध होता. यावरून दोन्ही कुटुंबात अनेकदा भांडणंही झाली होती. पण तरीही दोघेही सतत भेटत होते.
प्रमोद फडतरे यांचा 11 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर आरोपी अनुजाला तिचे वडील आणि त्यांची मैत्रीण एका घरात असल्याची माहिती मिळाली. तिने हा प्रकार भाऊ ऋषिकेशला सांगितला.
त्यानंतर रागाच्या भरात दोन्ही भाऊ आणि बहिणीने वडील आणि त्यांच्या प्रेयसीला काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले तर प्रेयसी अर्धमेल्या अवस्थेत पडली.
या घटनेनंतर दोन्ही भावंडे घाबरली. त्यांनी डॉक्टर सुनील पवार यांना फोन करून दोघांना मारहाण केल्याची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यास सांगितले.
मात्र रात्रीच्या वेळी वाहन उपलब्ध नसल्याने ते रुग्णालयात पोहोचले नाहीत. सकाळी मयत महिलेला बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या संपूर्ण प्रकाराने दोघेही भाऊ-बहीण घाबरले आणि त्यांनी शवविच्छेदन न करता त्यांनी मृतदेह घरी आणला आणि कोणालाही न सांगता हृदयविकाराचा झटका आल्याच्या बहाण्याने महिलेवर अंत्यसंस्कार केले.
घटनेनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून आजूबाजूचे लोक याबद्दल कुजबूज करु लागले. पण पोलिसांकडे ना तक्रार होती ना पुरावा. असे असले तरी बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. ज्यानंतर त्यांना एकामागून एक पुरावे सापडले.
कल्याण हादरलं! सार्वजनिक शौचालयात रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या
वेगवेगळ्या लोकांकडून चौकशी करून हा सीन रिक्रिएट करण्यात आला, त्यानंतर आरोपीला फोन करणाऱ्या डॉक्टरचा पोलिसांनी आधी जबाब घेतला. ज्यामुळे या खुनाचे गूढ उकलले. अखेर डॉक्टरांना पोलिसांकडून तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार डॉक्टरांनी ऋषिकेश प्रमोद फडतरे आणि अनुजा फडतरे यांच्यावर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT