राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात उमटले आहेत. त्यावर भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीसांनी भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांची पाठराखण केल्याचा आरोप होतोय. संजय राऊतांनी यावरूनच फडणवीसांवर प्रहार केलाय.
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. दोघांनी केलेल्या विधानांमुळे भाजप टीकेचं धनी ठरलंय. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली.
‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या बोलण्याचे निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आलेत,’ असं फडणवीस म्हणाले आहेत. तर सुधांशू त्रिवेदींनी कोणत्याही वक्तव्यामध्ये शिवाजी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही, असं फडणवीस म्हणाले.
राज्यपालांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले : वादावर फडणवीस आणखी काय म्हणाले?
फडणवीसांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी टीका केलीये. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘वक्तव्याचा विपर्यास केला गेला, हा फडणवीसांचा बचाव केविलवाणा आहे. मग आम्हीही राहुल गांधींच्या बाबतीत हे बोलू शकतो,” असं उत्तर राऊतांनी दिलं.
“राहुल गांधींच्या विधानाबाबत आम्ही तसं केलं नाही. जे चूक आहे ते चूकच म्हटलं पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल इतर कुणी काही बोललं असतं, तर तुम्ही थयथयाट केला असता. तुमचे राज्यपाल आहेत म्हणून तुम्ही गप्प बसलात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफी मागायला लावल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
‘अशा लोकांना पक्षाने कापून फेकून दिलं पाहिजे’; उदयनराजे भोसलेंच्या संतापाचा कडेलोट
देवेंद्र फडणवीस पाठराखण का करताहेत? छत्रपती संभाजीराजेंचा सवाल
फडणवीसांच्या भूमिकेवर छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘दोन दिवसांपासून मी परभणीच्या दौऱ्यावर आहे. मी त्यांचे रात्री ट्विट्स ओझरते बघितलेत. ते असं बोलताहेत, हे माझ्या दृष्टीकोनातून अयोग्य आहे. ज्या व्यक्तीनं असं स्टेटमेंट केलं असेल, तर त्याची पाठराखण करणं बरोबर नाही. ते अभ्यासू आहेत. ते पाठराखण का करताहेत हा माझ्या दृष्टीने प्रश्नचिन्ह आहे.”
“सुधांशू त्रिवेदींची ते त्यांची पाठराखण का करताहेत? मला त्यांचा प्रश्न समजला नाहीये. मी त्यांना विचारणार आहे की का पाठराखण करता आहात म्हणून. त्या त्रिवेंदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. त्रिवेदी बोललेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी पाठराखण करू नये. उलट देवेंद्रजींनी हे बघायला पाहिजे की तो माफी कसा मागेल”, असं छत्रपती संभाजीराजे फडणवीसांच्या भूमिकेवर म्हणालेत.
ADVERTISEMENT