१९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात राजस्थानमधील लोंगेवाला चौकीवर जीवाची बाजी लावणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी सैनिक भैरोसिंग राठौड यांचं सोमवारी निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. जोधपूर एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित ‘बॉर्डर’ या लोकप्रिय बॉलिवूड सिनेमामध्ये अभिनेता सुनील शेट्टीने त्यांची भूमिका साकारली होती.
ADVERTISEMENT
सीमा सुरक्षा दलाने ट्विट करुन राठौड यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. भैरोसिंग राठौड यांचा मुलगा सवाई सिंह यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. त्यानुसार, तब्येत खालावल्यानं आणि अर्धांगवायूमुळे भैरोसिंग राठौड यांना १४ डिसेंबर रोजी जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी ब्रेन स्ट्रोकचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. तेव्हापासून भैरोसिंग राठौड मागील काही दिवसांपासून अतिदक्षता विभागात होते.
भैरोसिंग राठौड यांनी शौर्याचा अध्याय लिहिला होता… :
जोधपूरपासून 120 किमी अंतरावरील सोलंकियातला गावात सवाई सिंह आणि त्यांचं कुटुंबीय राहते. 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात भैरोसिंग राठौड थार वाळवंटातील लोंगेवाला चौकीवर तैनात होते. त्यावेळी ते बीएसएफच्या एका लहान तुकडीचं नेतृत्व करत होते आणि त्यांच्यासोबत लष्कराची 23 पंजाब नावाची रेजिमेंटची एक कंपनी होती.
या सर्व जवानांच्या शौर्यानेच 5 डिसेंबर 1971 रोजी या ठिकाणी आक्रमक पाकिस्तानी ब्रिगेडला आणि टँक रेजिमेंटला धूळ चारली होती. त्यांच्या या शौर्यामुळेच 1972 मध्ये त्यांना सेना पदकानं गौरविण्यात आलं होतं. युद्धादरम्यान 14 व्या बीएसएफ बटालियनमध्ये तैनात असलेले भैरोसिंग राठौड 1987 मध्ये निवृत्त झाले होते.
ADVERTISEMENT