भंडारा येथील रुग्णालयात नवजात बालकांना ठेवण्यात आलेल्या खोलीत आग लागून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारने पहिली कारवाई केली आहे. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत रुग्णालयातील दोन नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नर्स शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबिलधुके यांच्याविरोधात भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
भंडारा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्याच्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. नुकत्याच जन्मलेल्या बालकांना न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. या युनिटमध्ये आग लागल्यानंतरही ड्युटीवर असलेल्या दोन्ही नर्स तिकडे पोहचल्या नाही. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता ही बाब समोर आली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही काही दिवसांपूर्वी याबद्दल माहिती देऊन नर्सनी दाखवलेला हलगर्जीपणा अक्षम्य असल्याचं म्हटलं होतं. फॉरेन्सिक टीमकडून अहवाल मिळाल्यानंतर अखेरीस याप्रकरणात दोन्ही नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीनंतर त्या रुममध्ये धूर तयार झाला. ज्यात १० बालकांना आपले प्राण गमवावे लागले. काही बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना यश आलं होतं. याप्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भंडाऱ्याला जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर देत सरकारी मदत जाहीर केली होती. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT