ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. दगड, स्टम्प्स आणि पेट्रोलच्या बॉटल्स जाधव यांच्या घराच्या दिशेनं भिरकावण्यात आल्या होत्या. या घटनेवर बोलताना भास्कर जाधव यांनी गंभीर विधान केलंय. राज्य सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर हा हल्ला झाला असून, मरेपर्यंत माघार घेणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.
ADVERTISEMENT
भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले, “पेट्रोल बॉम्बप्रमाणे पेट्रोल भरलेल्या बाटल्या फेकल्या. दगड, काठ्या लाठ्या फेकल्या आणि सुरक्षारक्षक ओरडल्यानंतर पळून गेले. मी एवढंच सांगेन की, जन्माला आलेला माणूस मरण्यासाठीच आलेला असतो. तो काही अमर नसतो. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधीही मरणाला घाबरलेलो नाही. असल्या भुरट्या हल्ल्यांना, तक्रारींना घाबरलेलो नाही. जर असंच होणार असेल, तर जे काय परिणाम होतील, त्याला सामोरं जाण्याची मी माझी तयारी ठेवली आहे.”
“आज सुद्धा मोर्चाला येणार होतो आणि आलो. आता माझं अचानकपणे संरक्षणच काढलं. ४० वर्षाच्या राजकीय जीवनात कधी संरक्षण घेतलं नाही. मागितलं नाही. मला संरक्षण मंजूर झालं, तेव्हा मी अनेकवेळा पोलीस अधीक्षकांना पत्र दिलेलं आहे. मी कधीही कुणाचा एक पैसा खाल्लेला नाही. बुडवलेला नाही. निवडणुकीला सव्वा रुपया वर्गणीसुद्धा मी गोळा केलेली नाही. मी कधी कुणाचा विश्वासघात केलेला नाही. मी राजकारण माझा व्यवसाय करून करतो. माझं कुटुंब, शेती करून मी राजकारण करतो. त्यामुळे मला संरक्षणाची गरज नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.
आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; अंगणात दगड, पेट्रोलच्या बॉटल्स सापडल्या
राज्य सरकारनं संरक्षण काढल्यानंतर घरावर हल्ला -भास्कर जाधव
“मागचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला संरक्षण दिलं होतं. माझ्याबरोबर एसपीओचे पोलीस दिले होते. काल रात्री घराजवळच संपूर्ण अचानकपणे संरक्षण काढलं गेलं. घराजवळ तीन पोलीस असायचे, तेही तिथे हजर नव्हते. मुंबईतही घराखालचे पोलीसही हजर नाही. याचा अर्थ सरकारनं माझं संरक्षण काढल्यानंत हल्ला झालेला आहे”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय.
देवेंद्र फडणवीसांनी सुरक्षा काढली? भास्कर जाधव काय म्हणाले?
“मी कुणाकडून फार काही अपेक्षा करत नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असं काही होईल याचा विचार मी कधीही केला नव्हता. कारण त्यांचे आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. मी त्यांना एक सुसंस्कृत राजकारणी समजतो. पण तेच पोलीस खात्याचे प्रमुख आहे. निश्चितपणे योग्य ठिकाणाहून मग गृहमंत्री असतली किंवा मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री असं करतील असं वाटत नाही, पण गृहमंत्र्यांकडूनच हे आदेश आले असावेत”, असं म्हणत भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलाय.
भास्कर जाधव : ‘बोलणारी माणसं मारून तुमचा पक्ष वाढणार असेल, तर आम्हाला मारा’
“माझं पोलीस संरक्षण काढलं असावं. पुन्हा सांगतो जन्माला आलेला माणूस मरण्यासाठीच आलेला असतो. मी तत्वाने जगतोय. निष्ठेनं जगतोय. अन्यायाच्याविरोधात प्रहार करतोय. मी जोपर्यंत जिवंत असेन, तोपर्यंत हे प्रहार करतच राहणार. तुम्ही, ईडी, सीबीआय, आयकर विभाग, पोलिसांच्या धाडी, एसीबी… पक्ष फोडून तुमचं समाधान झालं नाही म्हणून तुम्ही विरोधी पक्षातील बोलणारी माणसं मारून जर तुमचा पक्ष वाढणार असेल, तर निश्चितपणे आम्हाला मारा पण माघार घेणार नाही”, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी हल्ल्यानंतर भूमिका मांडलीये.
ADVERTISEMENT