– राकेश गुडेकर, रत्नागिरी
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीये. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिटवर डोळा दिसतोय, हे त्यांच्या कालच्या भाषणातून आणि कार्यक्रमातून जाणवलं’, असं म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी निशाणा साधला आहे.
शिवसेना (UBT) नेते तथा आमदार भास्कर जाधव हे आज चिपळूणमध्ये बोलत होते. पंतप्रधानांनी मुंबई दौऱ्यात विरोधकांना लक्ष्य केलं. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण मी पूर्णपणे ऐकलं, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भाषणं पूर्ण ऐकली.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा एकच गाभा होता. मुंबई महापालिकेची फिक्स्ड डिपॉझिट… मुंबई महापालिकेची बँकेत मोठी ठेव आहे. जवळपास 99 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम बँकेत फिक्स्ड डिपॉझिट आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत शिवसेनेची जी 25 ते 27 वर्ष सत्ता आहे. त्या कारकिर्दीतील ही सर्व रक्कम आहे. त्या रकमेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा आहे”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
देश अन् राज्यानंतर आता मुंबईवर नजर! मोदींनी फुंकलं BMC निवडणुकांचं रणशिंग
भास्कर जाधव म्हणाले, “भाजपच्या ताब्यातील नागपूर महापालिका पूर्णपणे कंगाल झालेली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आली आणि तिथे लूट झाली. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी तिथे 900 कोटींचा भ्रष्टाचार केला, तो बाहेर आला. आता मुंबईचा विकास करणं राहिलं बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केंद्र सरकारकडून काय देणार मुंबई महापालिकेला याचं अवाक्षर देखील काढलं नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे शोभत नाही, भास्कर जाधव काय म्हणाले?
“नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीने इथे येऊन अशी टीका करणं, हे एवढ्या मोठ्या उच्चपदस्थ माणसाला शोभत नाही”, असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
PM मोदींचं मुंबईत तडाखेबाज भाषण, ‘हे’ आहेत 10 महत्त्वाचे मुद्दे
“ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचा कारभार आला. त्यावेळी कोरोनाचं संकट आलं. त्यामध्ये कोणते निर्णय घ्यावेत, काय करावं, काय करू नये, हे नरेंद्र मोदी सरकार इथं केंद्रातून कळवत होतं. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यासारख्या उच्चपदस्थ माणसाने अशा प्रकारची टीका करणं हे त्या पदाला योग्य आहे, असं मला वाटत नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.
ADVERTISEMENT