विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना भाजप गुजरातमध्ये नेतृत्व बदललं. विजय रुपाणी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. तर त्यांच्या जागेवर भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या कारभाराची सूत्रं हाती घेतली. गुजरातमध्य अचानक झालेल्या या राजकीय भूकंपाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. भाजपच्या या निर्णयावर बोट ठेवत शिवसेनेनं चिमटा काढला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपला उपरोधिका टोला लगावला आहे. ‘पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’विषयी नेहमीच उत्सुकता असते. ज्या विषयांची कुणालाही कल्पना नसते, असे अनेक विषय धुंडाळून मोदी ‘मन की बात’ व्यक्त करीत असतात. अगदी खेळण्यांपासून ते पाळण्यांपर्यंत, पण त्यांच्या मनात काय चाललं आहे याचा शोध घेणं कठीण आहे, हे गुजरातच्या मुख्यमंत्री निवडीवरून स्पष्ट दिसले. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे नाव समोर आले तेव्हा ‘कोण हे महाशय?’ असा प्रश्न बहुतेक सगळ्यांनाच पडला’, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होतं व ते मोदी ‘यालाच’ किंवा ‘त्यालाच’ मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले’, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी मोदी-शाहांचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’
‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे. आता भूपेंद्र पटेल कोण? हे गूढच मानायला हवं. ते पटेल समाजाचे आहेत व गुजरातमधील पटेल समाज भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याने भूपेंद्रभाईंना मुख्यमंत्री केलं. तसं पाहिले तर नितीन पटेलांपासून ते प्रफुल पटेल खेडापर्यंत अनेक ज्येष्ठ पटेल नेते तेथे होतेच. आमदारकीची पहिली टर्म आनंदीबेन पटेलांच्या कृपेने मिळवणाऱ्या, शेवटच्या बाकावर बसणाऱ्या भूपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री करण्याचे कारण काय? पण धक्के देणं व फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र आहे. गुजरातमध्ये तेच घडले, असं भाष्य शिवसेनेनं केलं आहे.
‘मोदी यांनी अनेकदा अचानक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन ‘धक्का’ दिला होता. आता गुजरातमध्येही त्याच ‘धक्कातंत्रा’चा वापर झाला आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते मुख्यमंत्री असा आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. मावळते मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या काळात गुजरातमध्ये भाजप रसातळाला जात होती. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या तोंडास फेस आणला होता’, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
RSS च्या सर्वेक्षणात काय दडलंय? रुपाणींना का द्यावा लागला राजीनामा?
‘आताही कोविड-कोरोना काळात सरकारी यंत्रणा साफ कोलमडली, गावागावांत मृतांच्या चिता पेटत राहिल्या, सरकार हतबल व हताश होऊन मृत्यूचे तांडव पाहत होते हा संताप लोकांत होता व आहेच. गुजरातमध्ये बेरोजगारीचा भस्मासुर नाचतो आहे. अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. अहमदाबादजवळच्या ‘फोर्ड’ गाड्या बनवणाऱ्या कंपनीनं गाशा गुंडाळला व 40 हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. संपूर्ण गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आक्रोश करीत आहेत व निवडणुकांत या संतापाचा फटका बसेल ही खात्री असल्यानेच मुख्यमंत्री रूपाणी यांना बदलून भूपेंद्र पटेल यांना नेमले. ही फक्त रंगसफेदीच आहे’, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.
‘भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन पटेल यांचे समर्थक आहेत. रूपाणी यांच्यामागे अमित शहा होते. त्यामुळे गुजरातमधील उद्याचे राजकारण जितके गोंधळाचे तितकेच रोचक असेल. भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले. दिल्लीहून नाव आले व ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केले. नेता निवडीसाठी आमदारांनी मतदान केले असते तर दुसऱ्याच एखाद्या नावावर पसंतीची मोहोर उठली असती. काँग्रेस पक्षातही हे असेच घडते व यालाच आपल्याकडे लोकशाही म्हणावे लागते. लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे’, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला गुजरात मॉडेलवरून लक्ष्य केलं.
Gujrat CM : पहिल्यांदाच आमदार झाले अन् भाजपने केलं मुख्यमंत्री; कोण आहेत भूपेंद्र पटेल?
‘गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? याच पद्धतीने उत्तराखंड, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही काही दिवसांपूर्वी बदलण्यात आले. मध्य प्रदेशातही बदल केले जातील असे संकेत आहेत. फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत, तेथेही नेतृत्वबदल होतील असे प्रसिद्ध झाले आहे. कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?’, असा उपरोधिक सवाल शिवसेनेनं भाजपला केला आहे.
ADVERTISEMENT