राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भेट घेतली आहे. ही भेट मंगळवारीच होणार होती. मात्र आज काही वेळापूर्वीच ती भेट झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार हे विरोधकांची आघाडी उभी करण्याची तयारी करत आहेत का या चर्चा या भेटीमुळे सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
मंगळवारीच होणार होती शरद पवार नितीश कुमार भेट
दिल्लीत ही भेट झाली आहे. शरद पवार यांची भेट कालच नितीश कुमार घेणार होते. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जो प्रयोग केला तो सगळ्यांना परिचित आहेच. त्यांनी भाजपला बाजूला केलं आणि राजदसोबत जात सरकार स्थापन केलं. नितीश कुमार त्यानंतर दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी अऱविंद केजरीवाल, मुलायम सिंग यादव या नेत्यांची त्यांनी भेट घेतली. मुलायम सिंग यांच्यासोबत एक तास नितीश कुमारांची चर्चा झाली.
काय म्हटलं आहे नितीश कुमार यांनी?
आमची चर्चा सुरू आहे. पुढेही या चर्चा होतील. जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊ. सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षही एकत्र आले पाहिजेत तसं घडलं तर त्यात राष्ट्राचं हित आहे असंही नितीश कुमार म्हणाले आहे. सगळे पक्ष एकत्र आले तर २०२४ ला राष्ट्रहित घडेल असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का नितीश कुमार?
मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी नितीश कुमार हे विविध नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेत आहेत. अशात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तुम्ही २०२४ मध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील का? असा प्रश्न विचारल्यावर नितीश कुमार म्हणाले की मी चेहरा नसेन पण सगळ्यांची मोट एकत्र बांधायची यासाठी पूर्ण प्रय़त्न करणार आहे असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं.
बिहारचं राजकारण २०१० पासून कसं बदललं?
बिहारमध्ये झालेल्या मागच्या तीन निवडणुकांचा विचार केला तर त्याचा निष्कर्ष हा निघतो की ज्या दोन पक्षांनी एकत्र निवडणूक जिंकली ते पाच वर्षे सत्तेत राहू शकले नाही. मात्र नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.
२०१० ला जदयू आणि भाजप एकत्र आले होते मात्र २०१३ मध्ये त्यांची युती तुटली. २०१५ मध्ये जदयू आणि राजद यांची युती झाली आणि निवडणूक लढवली गेली मात्र २०१७ मध्ये ही युती तुटली. २०२० मध्ये जदयू आणि भाजप यांनी निवडणूक एकत्र लढवली मात्र २०२२ मध्ये ही युतीही तुटली. हे सगळं घडलं तरीही मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच कायम राहिले ही बाब विशेष आहे
ADVERTISEMENT