भाजपचे नेते आशिष शेलार यांनी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या न झालेल्या आघाडीबद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही अशाच आशयाचं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दरेकरांना उत्तर दिलं आहे. दरेकर त्यावेळी निर्णय प्रक्रियेत नव्हते. त्यांना माहिती नाही. खरी माहिती वेगळीच आहे, असं म्हणत खडसेंनी भाजप-शिवसेना युती तुटण्याबद्दल एक दावा केला आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ खडसे यांनी माध्यमांनी संवाद साधला. विरोधकांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल टीका होत आहे. त्यावर खडसे म्हणाले, “सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ झालेले नेते अडीच वर्षांपासून आदळआपट करत आहेत आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याच्या बोंबा मारत आहेत. राज्यात दंगली होताहेत का? बॉम्बस्फोट होताहेत का? कोणतं असं उदाहरण आहे, ज्यामुळे हे अशांतता असल्याचं सांगत आहेत.”
“महागाईने उच्चांक गाठला आहे. तेलाचे, मिठाचे भाव वाढले आहेत. खतांच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. डाळीच्या किंमती शंभर रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. याला जबाबदार कोण? त्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हनुमान चालीसा, भोंगे मुद्दे लावून धरत आहेत. गावांमध्ये अशांतता पसरवण्यासाठी उद्योग करायचे आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित करायचे. अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत. त्यांचा हेतू एकच आहे की, अशा बोंबा ठोकायच्या, राज्यपालांना भेटायचं आणि राष्ट्रपती राजवटीचा प्रयत्न यशस्वी करायचा, पण हा डाव यशस्वी होणार नाही,” असं खडसे म्हणाले.
‘शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याच्या सूचना भाजपच्या श्रेष्ठीकडून होत्या, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं आधीच ठरलं होतं,’ असं विधान प्रविण दरेकर यांनी केलं. त्यावर बोलताना खडसे म्हणाले, “प्रविण दरेकर भाजपत अलिकडच्या कालखंडात आले आहेत. त्या निवडणुकीच्या कालखंडात त्यांची भूमिका इतकी महत्त्वाची नव्हती. आता ते जे वक्तव्य करत आहेत. ते काही निर्णय प्रक्रियेत नव्हते, त्यामुळे त्यांना पुरेशी माहिती नाही. काही माहिती आहे, ती वेगळीच आहे.”
“खरं म्हणजे शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिलं असते. पहिल्यांदा दिलं असतं किंवा नंतर दिलं असतं. पंरतु तुम्हाला (भाजप) स्वतःलाच मुख्यमंत्री पद पाच वर्षांसाठी हवं होतं. त्यामुळे तुम्ही (भाजपने) युती तोडण्यास भाग पाडलं. त्यावेळी मी निर्णय प्रक्रियेत होतो. त्यामुळे त्या कालखंडात काय झालं, याची दरेकरांपेक्षा जास्त माहिती मला आहे,” असं उत्तर खडसे यांनी दरेकरांना दिलं.
ADVERTISEMENT