महाराष्ट्रात शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं आहे ते २१ जूनला. २१ जून २०२२ ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी तारीख आहे जी कधीही विसरता येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेऊन आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठलं. महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि शिवसेना सत्तेत असताना हे पाऊल एकनाथ शिंदे यांनी उचललं. थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. त्या दिवसापासून शिवसेना दुभंगली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे अनेक नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, खासदार हे शिंदे गटात जाताना दिसत आहेत. शुक्रवारी शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला योग्य दिशा देत आहेत असं मला वाटतं म्हणून मी त्यांना साथ देतो आहे असं गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या खासदारांची संख्या १२ वरून १३ झाली आहे. या घडामोडीवरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
काय आहे अतुल भातखळकर यांचं ट्विट?
सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे. असं म्हणत अतुल भातखळकर यांनी एका ओळीत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे.
अमोल किर्तीकर उद्धव ठाकरेंसोबतच
एकीकडे वडील गजानन किर्तीकर यांनी जरी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला असला तरीही त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी मात्र हातावरचं शिवबंधन सोडलेलं नाही. उलट शिवसेनेने बोलवलेल्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले तसंच गोरेगावमधून शिवसेनेला विजय प्राप्त करून देणार असाही निर्धार अमोल किर्तीकर यांनी केला आहे. त्यामुळे आता किर्तीकर पिता-पुत्रांमध्ये उभा दावा तयार झाला आहे. अशात आता अतुल भातखळकर यांनी एका ओळीचं ट्विट करून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. या टीकेला आता ठाकरे गटाकडून उत्तर दिलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी गजानन किर्तीकरांविषयी?
गजानन किर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. पक्षानं त्यांना काय दिलं नाही. ते पाच वेळा आमदार राहिले आहेत, तर दोन वेळा पक्षाकडून त्यांना खासदारकी मिळाली. दोन वेळा त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होता असे राऊत यावेळी म्हणाले. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर के कडवट शिवसैनिक आहेत, ते पक्षाबरोबरच असल्याचे राऊत म्हणाले. गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते ज्यावेळी सर्व काही भोगून पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते असे राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT