नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून बेछूट आरोप करत आहेत. भाजपवर आरोप करणं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणं हे त्यांना महागात पडू शकतं. कारण जर जे आरोप करत आहेत त्याचे पुरावे सापडले नाहीत तर गोष्टी कठीण होतात असं आता चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक आरोप करत आहेत. मात्र त्यात अकारण भाजपला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खेचत आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक करत असलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी दरवेळेला असा एक चेहरा उभा करते ज्यामुळे सामान्य माणसाचं मूळ प्रश्नांकडून लक्ष विचलित करायचं. आज महाराष्ट्रात महापूर येऊन गेला. अतिवृष्टी झाली, मराठवाड्यात अतोनात नुकसान झालं. कोव्हिडमध्ये जाहीर केलेली पॅकेजस फक्त कागदावर आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. एसटीच्या संपामध्ये आत्तापर्यंत २९ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. या सगळ्या प्रश्नांवर बोलण्यासारखं काहीच नाही त्यामुळे असे बेछूट आरोप केले जात आहेत.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री हे गायब तरी आहेत किंवा त्यांच्यावर कसले ना कसले गंभीर आरोप तरी लागले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री कुठे आहेत त्यांना शोधा असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडेंच्या पाठिशी समाज उभा राहिला आहे. तसंच भाजपही कोणत्याही प्रकारचा अन्याय हा अन्यायविरोधात लढणाऱ्या माणसांविरोधात खपवून घेणार नाही असंही आज चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. रविवारी चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये नवाब मलिक यांच्यासारखी माणसं खिशात ठेवतो असं ते म्हणाले होते. त्यानंतर नवाब मलिकांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता आज नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरच आरोप केले आहेत. त्या आरोपांना आज चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Drugs Case : दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार,
मलिकांचे पुरावे पवारांना देणार -देवेंद्र फडणवीस
नवाब मलिक यांनी काय आरोप केला आहे?
‘देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत. फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहतो. ज्याला भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे’, असा खळबळजनक आरोप मलिकांनी केला.
ADVERTISEMENT