राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना विरुद्ध भाजप वादाचा एक अंक संपतो ना संपतो तोच नवीन संघर्षाला सुरुवात झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यामुळे शिवसेना-भाजपमधला संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.
ADVERTISEMENT
दापोली तालुक्यीतल मुरुड येथे समुद्रकिनारी असलेलं अनिल परब यांचं वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याची घोषणा करत किरीट सोमय्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसह दापोलीत दाखल होणार आहेत.
मुलुंड येथील आपल्या निवासस्थानावरुन निघताना किरीट सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने कूच केलं.
दरम्यान किरीट सोमय्यांच्या या दौऱ्यामुळे दापोलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम, शिवसेनेचे दापोलीचे प्रभारी तालुकाध्यक्ष ऋषी गुजर यांनी किरीट सोमय्या यांना दापोलीत रोखून धरू असं आव्हान दिलं आहे. दुसरीकडे भाजपनेही सोमय्यांचा दौरा यशस्वी होण्यासाठी कंबर कसली आहे. सोमय्यांचा दौरा यशस्वी होणारच, दौरा रोखून दाखवाच असं प्रतिआव्हान भाजप नेते व माजी खासदार नीलेश राणे यांनी दिलं आहे.
यानिमीत्ताने पोलिसांनी दापोलीत सुरक्षाव्यवस्था वाढवली असून जिल्ह्यातून अतिरीक्त कुमक दापोलीत तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी सोमय्या यांच्या दौऱ्यावर टीका करताना, सोमय्या यांना नाटकं करायची सवय लागलेली आहे अशी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करणार असल्याचंही कदम म्हणाले. किरीट सोमय्या ज्या मार्गाने दापोलीत दाखल होणार आहेत तिकडे पोलिसांनी बॅरिकेटींग केलं असून सुमारे १०० गाड्यांच्या ताफ्यासह सोमय्या दापोलीत दाखल होऊन अनिल परबांच्या रिसॉर्टवर जाणार असल्याचं कळतंय. त्यामुळे आजच्या दिवसात यानिमीत्ताने शिवसेना विरुद्ध भाजप वादाचा आणखी एक अंक राज्यात पहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT