मुंबई: ‘काही जण हे रातआंधळे असतात तसे हे सत्ताआंधळे लोक बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा एकत्रित येऊन पाठराखण करत आहेत.’ असं म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आज (25 फेब्रुवारी) महाराष्ट्र भाजपच्या कोअर टीमची एक बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी बोलताना मलिकांच्या मुद्यावरुन शिवसेनेवर बरीच टीका केली.
ADVERTISEMENT
पाहा सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले:
‘1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडतंय की, रातआंधळे असतात तसे हे सत्ताआंधळे लोक बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा एकत्रित येऊन पाठराखण करत आहेत. संविधानातील तरतुदीचं उल्लंघन होतंय.’
‘संजय राठोडांना एक न्याय आणि देशविघातक कृत्याच्या संदर्भात जर चौकशी असेल तर विशिष्ठ धर्माचा आहे म्हणून सारंच्या सारं सरकार पाठिशी उभं राहतंय हे 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा घडतंय.’
‘संजय राठोडांचा राजीनामा घेऊन महाविकास आघाडीने हा संदेश दिला की, आम्ही संवेदनशील आहोत. पण ही संवेदना ज्या मुंबईत बॉम्बसफोट घडविणाऱ्या आरोपीची मालमत्ता ज्यांनी विकत घेतली त्यांच्या पाठिशी मात्र सरकार ज्या पद्धतीने उभं राहिलं, ज्या पद्धतीने महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. या विरुद्ध येत्या अधिवेशनात पूर्ण शक्तीने विरोध केला जाईल.’
‘सरकारने आतापर्यंत आंदोलन होऊच नये यासाठी आकड्यांचे निर्बंध टाकले. 200 च्या वर लोकांनी एकत्र येऊ नये. पण सरकारने नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर दहशतवाद, आंतकवाद याविरुध्द भाजप राज्यभर आंदोलन करुन या सरकारचा बुरखा टराटरा फाडेल.’
‘कोणत्याही पक्षाशी संबंधित व्यक्ती इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चौकशी होत असेल तर मंत्रिपदाचा दबाव टाकून या चौकशीवर प्रभाव पाडू नये यासाठी ही सभा आहे. गुन्ह्याला एक्सपायरी डेट नसते, दहशतवादाचा गुन्हा आधी घडला म्हणून त्याची चौकशी करायची नाही?’ असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
नवाब मलिकांना नेमकी अटक का झालीए?
दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली.
22 फेब्रुवारीला पहाटेच कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचं पथक पोहचलं होतं. ज्यांनी जवळजवळ दोन तास घरातच त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेलं आणि दुपारी तीन वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली होती. आता या सगळ्यात असा दावा केला जात आहे की, इक्बाल कासकरने दिलेल्या काही माहितीच्या आधारेच नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे.
नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता.
या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT