शनिवारीच गोव्यासह पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजपचे कलंगुटमधले आमदार आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी राजीनामा दिला आहे. लोबो यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे. सोमवारी त्यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आमदारकीचा राजीनामाही सोपवला आहे.
ADVERTISEMENT
मायकल लोबो यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘मी गोवा मंत्रिमंडळ आणि आमदारकी या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. गोवा भाजपकडून मनोहर पर्रिकर यांचा वारसा पुढे नेला जातो आहे असं मला वाटत नाही, दिसतही नाही. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना भाजपने सोयीस्करपणे बाजूला केलं आहे.’ असं म्हणत लोबो यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे.
मायकल लोबो आता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून लोबो यांनी सरकारवर नाराजी दाखवत आरोप करण्यास सुरुवात केली होती. यामुळे ते बरेच चर्चेत होते . मायकल लोबो हे 2005 साली भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांनी 2012 साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. ते सलग दोनवेळा आमदार झाले. गेल्यावर्षी त्यांना ग्रामीण विकास आणि घनकचरा व्यवस्थापन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. मात्र, आता त्यांनी मंत्रीपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.
मी गोव्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कलंगुट मतदारसंघातील लोक माझ्या निर्णयाचा आदर करतील अशी आशा आहे. पुढे काय पाऊल टाकायचे ते बघू. इतर पक्षांशी चर्चा सुरु आहे, असं मायकल लोबो यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
मायकल लोबो हे राज्यातील गर्भश्रीमंत नेते मानले जातात, त्यांच्या नेतृत्वाखाली बारदेश तालुक्यातील 4 ते 5 जागा निवडून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपच्या येथील उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोबो यांच्या काँग्रेस मध्ये जाण्याने बारदेश तालुक्यातील भाजपचे प्राबल्य कमी होऊन त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे
ADVERTISEMENT