काही दिवसांपूर्वी भाजप नेते नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. गडकरींनी पत्रकारांशी बोलताना ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगितलं होतं. परंतू यानंतर आता य चर्चांना खतपाणी घालणारी आणखी एक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत दानवेंसोबत भाजप प्रवक्त्या शायना एन.सी. या देखील उपस्थित होत्या. दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या भेटीचे फोटो टाकले असून यात राज ठाकरेंसोबत विविध विषयांवर चर्चा झाल्याचं दानवेंनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे राज्यमंत्री दानवेंसोबत संवादात राज ठाकरे यांनी “रेल्वेलगतच्या जागांवर असलेली घरं तोडण्याबाबत रेल्वे प्रशासन नागरिकांना वारंवार नोटिसा बजावून त्रास देत असल्याचा मुद्दा गंभीर असून त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे” असं मत मांडलं. याचसोबत काही महत्वाचे रेल्वे प्रकल्प तसंच रेल्वे नोकर भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य आदी महत्वाच्या विषयांबाबतही राज ठाकरे यांनी रावसाहेब दानवेंशी चर्चा केली. मनसे नेते बाळा नांदगावकरही या वेळी चर्चेदरम्यान उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतरही राज्यात अशाच पद्धतीने चर्चांना उधाण आलं होतं. गुढीपाडव्याच्या सभेत बोलत असताना राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत भाजपला सॉफ्ट कॉर्नर दाखवला होता. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा असो किंवा मग हिंदुत्व असो प्रत्येक मुद्द्यांवर भाष्य करताना राज ठाकरेंनी भाजपला पूरक भूमिका घेतल्याची टीका सत्ताधारी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी केली होती.
गडकरी-राज भेटीनंतर मनसे नेत्यांनीही भविष्यात भाजप-मनसे युती होणार का यावर सावध प्रतिक्रीया दिली होती. परंतू यानंतर अवघ्या काही दिवसांतच दुसरा मोठा भाजप नेता राज ठाकरेंच्या भेटीला आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT