सिंधुदुर्ग : सत्तेचा माज कसा होतो हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पालकमंत्री, जिल्हाधिकारी सगळे माझ्या खिशात आहेत, असे त्यांनी जाहिररित्या सांगितलं आहे. याआधीही नारायण राणे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना असाच सत्तेचा माज होता. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणेंचा सत्तेचा माज उतरविला होता. आता नितेश राणेंचाही सत्तेचा माज जनताच उतरवेल असा, पलटवार शिवसेना (ठाकरे गट) आमदार वैभव नाईक यांनी केला.
ADVERTISEMENT
ग्रामपंचायतीला माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही, निधी वाटप माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा” असा धमकी वजा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी मतदारांना दिला असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांचं हे वक्तव्य असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nitesh Rane : “माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर…”; नितेश राणेंची मतदारांना धमकी
नितेश राणे यांच्या याच धमकी आणि इशाऱ्याचा आमदार वैभव नाईक समाचार घेतला. नाईक म्हणाले, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांच्या नेतृत्वात नांदगावमधील सोसायटी निवडणुकीत ग्रामस्थांनी शिवसेनेवर विश्वास दाखविला. तसाच विश्वास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही जनता शिवसेनेवर दाखवेल. आता होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार नितेश राणे यांचा पराभव अटळ झाला आहे. जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून येणार आहेत. त्यामुळेच म्हणून नितेश राणे मतदारांना धमकी देऊन सत्तेचा माज दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.
याधीसुद्धा नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील त्यांना असाच सत्तेचा माज होता. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणेंचा सत्तेचा माज उतरविला होता. मुख्यमंत्री झालेले राणे देखील पराभूत झाले होते. आताची सत्ता कोर्टाच्या आदेशाने कधीही पडू शकते, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खिशात असलेल्या आमदार नितेश राणेंना सत्ता असून देखील मंत्रिपद मिळालेले नाही आणि ते कधीही मिळणार नाही, असाही टोला आमदार नाईक यांनी लगावला.
शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास झाला. तसाच गावचाही विकास ग्रामपंचायतच्या माध्यमातून होईल. जिल्ह्यातील जनतेला अपेक्षित विकास केला जाईल. प्रा. मधु दंडवते, बॅ. नाथ पै. यांचा वारसा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा अशा प्रवृत्तीला येथील जनता थारा देणार नाही, असा आशावाद आमदार वैभव नाईक यांनी यावेळी बोलून दाखविला.
ADVERTISEMENT