मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्द्यांवरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच राजकारण तापलं आहे. मंगळवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर घालविल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी एमआयडीसीने वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना 5 सप्टेंबर 2022 रोजी सामंजस्य करारासाठी दिलेल्या निमंत्रणाचं एक पत्रही वाचून दाखविलं.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या याच आरोपांना आता भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे. स्वत:चे दोष दुसर्यांच्या माथी कसे मारायचे, हे ठाकरेंकडूनच शिकायला हवे. स्वत: काही करायचे नाही आणि दुसर्यांनी केले की, महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करायचा, हे त्यांनाच जमावे, असं म्हणतं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले केशव उपाध्ये?
मानलं बुवा आदित्यजींना, फॉक्सकॉन असो, एअरबस असो,मध्यप्रदेशातील उर्जा प्रकल्प असो की,बल्कड्रग पार्क, सॅफ्रान या सार्या प्रकल्पांबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टो 2022रोजी सविस्तर पत्रपरिषद घेऊन सर्व प्रश्नांना उत्तरे दिली होती.
ही घ्या लिंक :
पण, स्वत:चे दोष दुसर्यांच्या माथी कसे मारायचे, हे ठाकरेंकडूनच शिकायला हवे. स्वत: काही करायचे नाही आणि दुसर्यांनी केले की, महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करायचा, हे त्यांनाच जमावे. दुसर्या कुणाची तशी हिंमतही होणार नाही. फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही, हे सुभाष देसाईंनीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगितले होते. शिवाय, उद्योग येण्यासा ठी जे मंत्रिमंडळ निर्णय करायचे असतात, ते केले नव्हते. उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 15 महिने घ्यायची नाही आणि आरोप भाजपावर करायचे. केवढी हिंमत?
राज्यात नवीन सरकार आले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, तर त्यावर शंका उपस्थित करायची. फॉक्सकॉन हा महाविकास आघाडीने घालविलेला प्रकल्प आहे. त्यांना आरोप करण्याचा अजिबात अधिकार नाही, ही वस्तुस्थिती असताना आरोप केले जातात. अर्थात आजचा दिवस का निवडला गेला, याचे कारण सापडले आहे. सकाळी महाराष्ट्रात 10,500 कोटींच्या गुंतवणुकीसाठी जागा दिली गेली आणि लगेच पत्रकार परिषदेचे निरोप गेले. मानलं बुवा या महाराष्ट्रद्रोहींना! आमची विनंती आहे, आमच्यावर टीका करण्याच्या नादात राज्याची बदनामी करू नका, असंही उपाध्ये म्हणाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आता गुजरातमध्ये गेला. प्रकल्प गुजरातमध्ये गेला त्याचं वाईट वाटत नाही. मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो युवकांचा लोकांचा रोजगार गेला, आणि त्याबद्दल कोणीच बोलत नाही. हा प्रकल्प आमच्यामुळे गेला असा आरोप झाला. महाविकास आघाडीच्या काळात यावर काहीच कार्यवाही झाली नाही, असा आरोप झाला. यावर आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. त्याला आता दीड महिन्यांनी उत्तर आलं आहे.
5 सप्टेंबर 2022 रोजी एमआयडीसीच्या वतीने वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना सामंजस्य करार सही करण्यासाठी एका पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आलं होतं. मी यापूर्वीही हा पत्रव्यवहार झाल्याचं सांगतं होतो. पण तेव्हा ते पत्र आमच्या हातात नव्हतं. खोके सरकारमध्ये बसलेल्या आमच्याच लोकांनी मला याबाबत माहिती दिली होती.
या पत्रानुसार एमआयडीसीने वेदांताला वीज, पाणी आणि जमिनीसह दिलेल्या सर्व ऑफर्सची माहिती आहे. जेव्हा सामंजस्य करारासाठी एखाद्या कंपनीला निमंत्रण दिलं जातं तेव्हा प्राथमिक टप्प्यातील सर्व बोलणी झालेली असते. सर्व अटी-शर्ती ठरलेल्या असतात. केवळं कागदोपत्री प्रक्रिया होणे बाकी असते.
मग अशावेळी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेलाच कसा असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला. उद्योगमंत्री आणि उपमुख्यमंत्री खोटं बोलतायत का? घटनाबाह्य मुख्यमंत्री तर यावर बोलतच नाहीत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, त्यांनी माझ्याशी माध्यमांसमोर यावर चर्चा करावी. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडूनचं मला यावर उत्तर हवं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, काल आमच्या सरकारला तीन वर्ष झाली असती. अडीच वर्षांत आम्ही कोट्यावधींचे प्रकल्प आणले. महाविकास आघाडीने दावोसमध्ये ८० हजार कोटी असतील किंवा अडीच वर्षांमध्ये जवळपास साडेसहा कोटींची गुंतवणूक आणली. मात्र आज त्याचं श्रेय दुसरेच लाटत आहेत. हे खोके सरकार नको त्या गोष्टींच्या मागे धावत आहे. शिंदे सरकार फक्त राजकारण करत आहे, असाही आरोप त्यांनी केला.
ADVERTISEMENT