अंधेरी पोटनिवडणूक : भाजपचा दिल्लीतला नेता मुंबईत, फडणवीसांची शिंदेंबरोबर बैठक, आज अंतिम निर्णय

मुंबई तक

• 05:47 AM • 17 Oct 2022

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत राज ठाकरेंच्या पत्रानंतर वाढलीये. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाने केल्यानंतर आता सगळ्यांचच नजरा भाजपकडे लागल्यात. रविवारी रात्रीपासून भाजपच्या गोटात याबद्दल खलबतं सुरू असून, भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी.टी. रवी मुंबईत आलेत. तर दुसरीकडे भाजपला निर्णय घेण्यास लागत असलेल्या वेळेची काही कारणांबद्दलही आता बोललं जात आहे. […]

Mumbaitak
follow google news

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत राज ठाकरेंच्या पत्रानंतर वाढलीये. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाने केल्यानंतर आता सगळ्यांचच नजरा भाजपकडे लागल्यात. रविवारी रात्रीपासून भाजपच्या गोटात याबद्दल खलबतं सुरू असून, भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी.टी. रवी मुंबईत आलेत. तर दुसरीकडे भाजपला निर्णय घेण्यास लागत असलेल्या वेळेची काही कारणांबद्दलही आता बोललं जात आहे.

हे वाचलं का?

मनसेने मुरजी पटेल यांना पाठिंबा द्यावा म्हणून आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. पण, त्या भेटीनंतर राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्रातून निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत रंगत येण्यास सुरूवात झाली.

राज ठाकरेंच्या पत्रानंतर शरद पवारांनीही हेच आवाहन केलं. राज ठाकरे आणि शरद पवारांनंतर भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटानेच ऋतुजा लटकेंना बिनविरोध निवडून देण्याची मागणी एकनाथ शिंदेंकडे केली. यासाठी पुढाकार घेण्याचंही आवाहन करण्यात आलंय. प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर भाजपवर माघार घेण्यासाठी दबाव वाढल्याची चर्चा सुरू झाली.

आशिष शेलार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्या. मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलारांनी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर आता भाजपचे राष्ट्रीय महासचिव मुंबईत दाखल झालेत. सी.टी. रवी हे आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

निवडणूक लढवण्याची आशिष शेलारांची भूमिका?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे विरोधात शिंदे गट उमेदवारी देणार की भाजप अशी उत्सुकता होती. मात्र, आशिष शेलार यांनी लगेच मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा केली.

मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा पक्षाकडून अधिकृतपणे अखेरच्या दिवशी करण्यात आली. मुरजी पटेल हे शेलारांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळेच आशिष शेलार ही निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याचं समजतंय. आशिष शेलार सुरुवातीपासून या निवडणुकीच्या तयारीत होते आणि आता बिनविरोध करण्याच्या मागणीमुळे भाजपवर दबाव निर्माण झाल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच आशिष शेलाराची निवडणुकीबद्दलची भूमिका आणि बिनविरोध करण्याची मागणी अशाच पेचात सध्या भाजप असून, त्यामुळेच अंधेरी पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदेंबरोबर बैठक

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीसांनी या विनंतीवर गांभीर्यानं विचार करू असं म्हटलं होतं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल, असंही म्हटलं होतं. मात्र, त्यांनी माघार घेणार नाही, असं म्हटलेलं नव्हतं. त्यात आता आशिष शेलारांनंतर फडणवीस एकनाथ शिंदे आणि सी.टी. रवी यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिंदे आणि रवी यांच्या बैठकीत मुरजी पटेलांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, याचीच दाट शक्यता सध्याच्या स्थितीत निर्माण झालीये.

    follow whatsapp