Naseeruddin Shah: “जोपर्यंत जगात माणुसकी आहे तोपर्यंत नरेंद्र दाभोलकर हे नाव राहिल”

मुंबई तक

• 11:14 AM • 28 Oct 2022

जगात जोपर्यंत माणुसकी आहे तोपर्यंत जगात नरेंद्र दाभोलकर हे नाव राहिल याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी केलं आहे. कसोटी विवेकाची या कार्यक्रमात नसीरूद्दीन शाह यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि दिवंगत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. काय म्हटलं आहे नसीरूद्दीन शाह […]

Mumbaitak
follow google news

जगात जोपर्यंत माणुसकी आहे तोपर्यंत जगात नरेंद्र दाभोलकर हे नाव राहिल याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी केलं आहे. कसोटी विवेकाची या कार्यक्रमात नसीरूद्दीन शाह यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि दिवंगत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे नसीरूद्दीन शाह यांनी?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे असं एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्या कामाच्या पाऊलखुणा या मिटणार नाहीत. उलट त्या आणखी खोलवर रूजत जातील. जोपर्यंत जगात थोडी तरी माणुसकी शिल्लक आहे तोपर्यंत नरेंद्र दाभोलकर हे नाव राहिल. नरेंद्र दाभोलकर हे एक महान व्यक्ती होते. त्यांचं व्यक्तिमत्व कायमच लक्षात राहण्यासारखं आहे.

पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हे खरं बोलले म्हणूनच..

गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश तसंच तुरुंगात असणारे अनेक कार्यकर्ते खरं बोलत होते म्हणूनच अडचणी निर्माण केल्या गेल्या. आजही अंधश्रद्धा आपल्या देशात आहेत. त्याचप्रमाणे शेजारच्या देशातही आहेत. इराणमध्ये हिजाबवरून लढत असूनही त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. लहानपणी एक मौलवी मला शिकवायला यायचे कुराणबाबत बुद्धिला पटणार नाहीत अशा किंवा मूर्खासारख्या गोष्टी सांगायचे असंही नसीरूद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.

दाभोलकरांना मारलं गेलं पण त्यांचा विचार अजूनही अधोरेखित होतो आहे

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. मात्र त्यांनी मांडलेला विवेकाचा विचार मारणं कुणालाही शक्य नाही. उलट तो आज घडीला अधिकच अधोरेखित होतो आहे असंच दिसतं आहे असंही नसीरूद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. माझ्यासारख्या लोकांना अभिमान आहे की नरेंद्र दाभोलकरांसारख्या विवेकाची प्रेरणा देणाऱ्या माणसाच्या युगात माझा जन्म झाला.

अभिनेते नसरूद्दीन शाह अनेक वर्षे नाट्य आणि सिनेसृष्टी कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी रत्ना पाठक यादेखील अभिनेत्री आहेत. नसरूद्दीन शाह यांनी त्यांच्या करिअरची नाटकांमधून केली. त्यांनी दिल्लीच्या एनएसडी या संस्थेतून रितसर अभिनयाचे धडे घेऊन अभिनयाचा श्रीगणेशा केला. आजवर शाह यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

२० ऑगस्ट २०१३ ला नेमकी घटना काय घडली होती?

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या झाली त्यावेळी शिंदे पुलावर सफाई करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी जवळच्या एका झाडावर माकड आल्याने आवाज झाला. तसेच कावळ्यांचा आवाज देखील येऊ लागल्याने या दोघांनी त्या दिशेला पाहिले. त्याच वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर दाभोलकर काही क्षणात खाली कोसळले. त्यानंतर हे हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले आणि दुचाकीवरून पळून गेले

    follow whatsapp