मला काहीही झालं तर त्या गोष्टीसाठी नाना पाटेकर जबाबदार असतील अशी पोस्ट अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तनुश्री दत्ताने तिच्या इंस्टाग्राम पेजवर ही पोस्ट लिहिली आहे. भारतात #MeToo ची मोहीम तनुश्री दत्ताने सुरू केली. तिने नाना पाटेकर या अभिनेत्याने माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. तसंच अनेक अभिनेत्रींनी समोर येत त्यांच्यासोबत काय घडलं होतं तेही सांगितलं होतं. आता तनुश्री दत्ताची नवी पोस्ट चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे तनुश्री दत्ताने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये?
जर मला काहीही झालं तर त्यासाठी नाना पाटेकर, त्याचे वकील, त्याचे सहकारी आणि त्याचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. बॉलिवूड माफिया कोण? हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. हे ते लोक आहेत जे सुशांत सिंग राजपूत प्रकरणात होते. त्यांची नावं सातत्याने समोर येतात तेच लोक आहेत असं उत्तरही तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये दिलं आहे.
नाना पाटेकरचे चित्रपट पाहू नका, तसंच त्याच्या बॉलिवूड माफिया मित्रांचेही चित्रपट पाहू नका. या सगळयांवर बहिष्कार टाका. प्रत्येकजण त्यांच्या मागे लागा आणि त्यांना जाब विचारा. त्यांचं आयुष्य नरक झालं पाहिजे ही आता समाजाची जबाबदारी आहे. या लोकांनी मला प्रचंड त्रास दिला आहे. कायदा आणि न्यायव्यवस्था अपयशी ठरली असली तरीही माझा या महान देशातील लोकांवर पूर्णतः विश्वास आहे.
कलाक्षेत्रातील काही लोकांनी आणि पत्रकारांनी माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या. ज्यांनी मला खूप त्रास दिला त्या सर्वांचं जीवन नरकासारखं बनवा कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे असाही उल्लेख तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये केला आहे. तसंच जय हिंद असं म्हणत तिने पुन्हा भेटू असंही या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. नाना पाटेकर आणि सुशांत सिंग प्रकरणातले बॉलिवूड माफिया अशी नावं तनुश्रीने घेतल्याने खळबळ उडाली आहे.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर काय आरोप केले होते?
२००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज या सिनेमात नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता काम करत होते. या सिनेमातलं एक गाणं शूट होतं होतं तेव्हा नाना पाटेकर यांनी माझी छेड काढली, तसंच माझा लैंगिक छळ केला असा गंभीर आरोप #MeToo असा टॅग देत तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये केला होता.तसंच तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांच्या विरोधात एफआयआरही दाखल केली.
नाना पाटेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आणि हे आरोप बिनबुडाचे तसंच निराधार असल्याचं म्हटलं होतं. २०१९ मध्ये नाना पाटेकरांना या प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे. आता तीन वर्षांनी पुन्हा एकदा एक पोस्ट लिहून तनुश्रीने नाना पाटेकर यांनाच लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT