जळगाव: कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्या वहिनीच्याच डोक्यात कुर्हाडीने वार करत तिची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. काल (शुक्रवार) रात्री जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगर परिसरातील मयूर कॉलनीत हा संपूर्ण थरार सुरु होता. योगिता मुकेश सोनार (वय 39 वर्ष) असे हत्या झालेल्या महिलेचे तर दीपक लोटन सोनार (वय 38 वर्ष) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
ADVERTISEMENT
मृत योगिता सोनार या मयूर कॉलनीत त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. साधारण वर्षभरापूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही निधन झाले होते.
दरम्यान, त्यानंतर योगितासोबत तिच्या सासरकडील लोकं सातत्याने वेगवेगळ्या कारणावरुन वाद घालत होते. शुक्रवारी अशाच प्रकारचा वाद योगिता आणि त्यांचा दीर दीपक सोनार यांच्यात झाला. यावेळी अचानक दीपकने आपली वहिनी योगिता हिच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घातले. ज्यामध्ये योगिताचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दीपकला तात्काळ अटक केली आहे.
धक्कादायक ! भांडण करु नको सांगणाऱ्या वडिलांची १३ वर्षीय मुलाकडून हत्या
योगिताच्या मृत्यू प्रकरणी तिची बहिण कमलादेवी हिने तिच्या सासरकडील मंडळींवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्या बहिणीचा तिच्या सासरकडील मंडळींनी संपत्तीसाठीच हत्या केली आहे. यावेळी फक्त दिराला अटक करुन उपयोग नाही. तर सासू, नणंद, नणदेचा पती आणि भाचा जयेश यांना अटक केली पाहिजे. तसंच या सगळ्या कटात प्रिंपाळ्याचा तलाठी देखील सहभागी आहे. त्याला देखील अटक केली पाहिजे. कारण या सगळ्यांनी कट रचून माझ्या बहिणीची हत्या केली आहे. असा आरोप कमलादेवी हिने केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.
ADVERTISEMENT