उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आलं आहे. काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा असतानाही काँग्रेसला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यातच माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही पराभव स्विकारावा लागल्यामुळे काँग्रेसच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळलं गेलंय. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये आता अंतर्गत वादाला सुरुवात झालेली आहे. हरिश रावतांनी तिकीटं विकल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
या आरोपांमुळे उद्विग्न झालेल्या रावतांनी पक्षाने माझा राजीनामा घ्यावा आणि होळीत माझं दहन करावं अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तराखंडमधील काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांना हरिश रावत यांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं आहे. ज्यात हरिश रावत म्हणतात….
पद आणि पार्टी तिकीटं विकल्याचा आरोप माझ्यावर होतोय जो गंभीर आहे. जो माणूस याआधी मुख्यमंत्री राहिलेला आहे, जो पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला आहे, जो पार्टीचा महासचिव होता आणि काँग्रेस कार्यकारणिची सदस्यही होता अशा व्यक्तीवर हे आरोप करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला आरोप करणारा व्यक्ती महत्वाच्या पदावर असून त्याने केलेल्या आरोपांची जर इतर लोकं री ओढत असतील तर प्रकरण गंभीर होऊन जातं. मी देवाकडे प्रार्थना करतो की पक्षाने मला निलंबीत करावं, आपल्यातील वाईट शक्तींचं होळीत दहन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे हरिश रावतच्या रुपाने वाईट शक्तीचं काँग्रेसने होळीत दहन करावं.
हरिश रावत – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत ७० जागांपैकी काँग्रेसला फक्त १९ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर भाजपने ४७ जागांवर बाजी मारत संपूर्ण बहुमत मिळवलं. इतर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.
इतक्या महागाईनंतरही लोकं भाजप जिंदाबाद म्हणत असतील तर… – हरिश रावतांची हताश प्रतिक्रीया
ADVERTISEMENT