ओला दुष्काळ, पावसाने दिलेली हुलकावणी, दुबार पेरणीचं संकंट अशा अनेक संकटाचा सामना करुन उभारी घेणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा संकटांचा सामना करावा लागत आहे. बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल दर उतरल्यामुळे अनेक भागांत शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पिकवलेला माल फेकून द्यायची वेळ आली आहे.
ADVERTISEMENT
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडीचा शेतकरी खंडू राजगुरुने शेतात भोपळी मिरचीची लागवड केली. परंतू बाजारात या भोपळी मिरचीला फक्त दोन रुपये किलो दर मिळत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने इंदापूरच्या रस्त्यावर आपला माल फेकत सरकारचा निषेध केला.
खंडू राजगुरु यांनी रविवारी आपल्या शेतातली भोपळी मिरची बाजर समितीत लिलावासाठी आणली. यासाठी त्यांनी शनिवार आणि रविवार दोन दिवस रोजंदारीवर महिला कामाला लावल्या. त्याआधी लोडशेडींगचं संकट, पीक जगावं म्हणून डिझेलने जनरेटर सुरु करुन पिकाला पाणी देणं अशी अपार मेहनत राजगुरू यांनी घेतली. परंतू लिलावात मिरची आल्यानंतर तिला मिळणारा दर पाहिल्यानंतर राजगुरु यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुरडा झाला.
रोजंदारीसाठी लावलेल्या महिलांचं वेतन देण्याइतके पैसे या लिलावातून राजगुरू यांना मिळत नव्हते. अखेरीस संतापलेल्या राजगुरु यांनी आपली भोपळी मिरची इंदापूरच्या रस्त्यावर आणत रस्त्यावर फेकून दिली. काही जणांना फुकट माल वाटून या शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त केला. बाजारात दोन रुपये दर मिळणारी मिर्ची बाहेर येऊन २० रुपये किलोने विकली जात असल्याबद्दल शेतकऱ्याने सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
काही दिवसांपूर्वी टोमॅटोला दर मिळत नसल्यामुळे येवल्यात शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे रस्त्यावर आपला माल फेकून दिला होता. मिरची, काकडी, टोमॅटो, भोपळी मिरची अशा सर्व भाज्यांना सध्या बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. योग्य भाव मिळत नसल्यामुळे कष्ट करुन पिकवलेला माल आता शेतकऱ्याला फेकून देण्याची वेळ येत आहे.
ADVERTISEMENT