सुप्रिया सुळेंऐवजी संजय राऊतांना मुख्यमंत्री बनवण्याचा ‘अजेंडा’; चंद्रकांत पाटलांचा दावा

मुंबई तक

• 01:42 PM • 21 Feb 2022

शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या अजेंड्यावर काम करत असून, त्यांना मुख्यमंत्री बनवलं जाणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज केला. मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी राऊतांवर केली. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आवरावं, अशी विनंती उद्धव ठाकरेंना केली होती. त्यावरून […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या अजेंड्यावर काम करत असून, त्यांना मुख्यमंत्री बनवलं जाणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज केला. मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी राऊतांवर केली.

हे वाचलं का?

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आवरावं, अशी विनंती उद्धव ठाकरेंना केली होती. त्यावरून संजय राऊतांनी “आम्हाला ज्ञान शिकवू नका,” प्रत्युत्तर पाटलांना दिलं. राऊतांनी केलेल्या टीकेला आज पाटील यांनी उत्तर दिलं.

संजय राऊत सोमय्यांना म्हणाले XX; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला

“मी संजय राऊतांना सल्ला दिलेला नाही. त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करू शकत नाही. उद्धव ठाकरे हे आमचे मित्र आहेत. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते चिरंजीव आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. हे कोण संजय राऊत. काल-परवा शिवसेनेत आले आणि कुणाला शिकवत आहेत? आम्ही उद्धवजींना बोललो”, असं पाटील म्हणाले.

“आम्हाला जे आकलन आहे, त्या आकलनामध्ये संजय राऊत शरद पवार यांनी दिलेल्या अजेंड्यावर काम करत आहेत. अडीच वर्ष पूर्ण होत आल्यामुळे त्यांना (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री पदावरून घालवणं. थेट सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करू शकत नाहीत. ते सगळे मान्य करणार नाहीत म्हणून संजय राऊत मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्यासाठी (शरद पवार) सुप्रिया सुळेच मुख्यमंत्री झाल्यासारखं आहे. त्यामुळे मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम सुरू आहे. हे मला वाटलं आणि ते मी म्हणालो,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

ज्यांना जी भाषा समजते त्यांच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं – राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

“मी मध्यस्थी करण्याएवढा मोठा नाही. सल्ला देण्याइतकाही मी मोठा नाही. मत व्यक्त करण्याचा अधिकार मात्र, मला लोकशाहीने दिलेला आहे. मध्यस्थी करायला खूप लोकं तयार आहेत, पण एकदा सत्तेची हवा डोक्यात गेली की, ती निघणं फार अवघड असतं”, असं पाटील म्हणाले.

तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या तिसऱ्या आघाडीच्या दौऱ्याबद्दल पाटील यांनी भाष्य केलं.”२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजप पक्षांचं महागठबंधन तयार करण्यात आलं होतं. आता भाजपाला बहुमत मिळणार नाही, अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळालं. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही”, असा टोला पाटील यांनी लगावला.

    follow whatsapp