– विकास राजुरकर, चंद्रपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
कोरोनाविरुद्ध लढाईत सरकारी यंत्रणा लसीकरणावर भर देण्याचं आवाहन लोकांना करत आहेत. महाराष्ट्रात सध्या लसीकरणाने वेग घेतलेला असला तरीही काही भागांत नागरिकांध्ये लस घेण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. यावर चंद्रपूर महानगरपालिकेने एक नामी शक्कल लढवली आहे.
दुकानदार किंवा दुकानातील कामगारांनी लस घेतलेली नसेल तर मनपाचे अधिकारी दुकानाबाहेर बोर्ड लावून नागरिकांना सुचना देत आहेत.
या दुकानात काम करणाऱ्या लोकांनी अजुनही कोरोनाची प्रतिबंधक लस घेतली नाही. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्या जबाबदारीवर प्रवेश करावा असे बोर्ड चंद्रपुरातील दुकानाबाहेर लावण्यात आले आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेचं एक पथक आज बाजारपेठेत जाऊन दुकानदार आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची कागदपत्र तपासत होती. या तपासणीत ज्या दुकानदारांनी किंवा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाहीये त्या दुकानाबाहेर मनपा कर्मचारी ग्राहकांसाठी बोर्ड लावत आहेत.
दरम्यान, लसीकरण मोहीमेला वेग यावा यासाठी मनपाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. लसीकरण न झालेल्या भागात मोबाईल लसीकरण व्हॅन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याचसोबत वेगवान आणि विक्रमी लसीकरणासाठी महापालिकेने विविध पथके तयार केली आहेत. चंद्रपूरच्या व्यापारपेठेत ही पथके प्रत्यक्ष जाऊन मालक- नोकरवर्गाच्या लसीकरण कागदपत्रांची तपासणी करत आहे. एखाद्या बाजार क्षेत्रात लसीकरण न झालेल्याची संख्या अधिक असल्यास त्या भागात मोबाईल लसीकरण व्हॅन द्वारे सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
तिसरी लाट येण्याआधी चंद्रपूर महापालिका क्षेत्रात लसीकरण पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर मनपाने अवलंबलेल्या या मार्गाचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT