मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील तब्बल १५ ते १६ आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात परतणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, शिंदे गटातील पंधरा ते सोळा आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत. त्यांना असे वाटत आहे की, आपण उगाचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडले. बाळासाहेबांनी आपल्याला मोठे केले आणि त्यांच्या माघारी आपण उद्धव साहेबांना सोडले.
ADVERTISEMENT
चंद्रकांत खैरे यांनी काय म्हटलं आहे?
शिंदे गटातील आमदार सध्या अस्वस्थ आहेत. ते आता आम्हाला फोन करतात आणि आम्हाला म्हणतात की, साहेब आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १६ आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार पडणार आहे. त्यांना हेही माहित आहे की आपण फक्त ५० जण आहोत आणि भाजपवाले ११६ आहेत. ते कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील आणि त्यांचा कोटा पूर्ण करतील. परत आपलं काय होणार? त्यामुळे ते आमच्या संपर्कात आले आहेत, असाही दावा खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
ईडी, सीबीआय आणि आमिष देऊन सरकारं पाडणं हेच सूत्र; मोदी सरकारबद्दल शरद पवार काय म्हणाले?
नाराजी नाट्यावरही प्रतिक्रिया :
औरंगाबादमधील संजय शिरसाट यांच्या बहुचर्चित नाराजी नाट्यावरही खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये उद्रेकता वाढली आहे. गेलेल्या सर्व 50 आमदारांना तर आता मंत्रिपद मिळणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्यामध्ये उद्रेकता वाढत आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी प्रोटोकॉलनुसारच माझा सत्कार आधी केला असेही खैरे म्हणाले.
काय झाले होते औरंगाबादमध्ये?
औरंगाबाद पोलीस आयुक्तलयाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शिरसाट यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदिप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त असे सर्वजण उपस्थित होते. याचवेळी सहाय्यक आयुक्तांनी सत्कारासाठी आमदार शिरसाट यांच्याआधी चंद्रकांत खैरे यांचे नाव पुकारले.
शिवसेना नेतेपदी निवड होताच भास्कर जाधवांचा संकल्प; महाविकास आघाडीचा नाही पण…
मात्र सत्कारासाठी आपल्याआधी खैरे यांचे नाव घेतल्याने शिरसाट यांचा पारा चांगलाच चढल्याचे पाहायला मिळाले. शिरसाट तडकाफडकी जागेवरून उठून निघाले. पण शेजारीच बसलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात पकडत रोखले. शिरसाट रागात म्हणाले, प्रोटोकॉल वगैरे काही आहे की नाही? पण जलिल आणि मंत्री अतुल सावे यांनी त्यांना कसेबसे शांत केले. त्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी छातीवर हात ठेवत अधिकाऱ्यांना तत्काळ बदल करण्यास सांगितले आणि नंतर वातावरण शांत झाले.
ADVERTISEMENT