राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा ७५ वा वाढदिवस मुंबईत साजरा झाला. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ यांच्या आठवणींना उजाळा दिला. छगन भुजबळ हे जर शिवसेनेत राहिले असते तर केव्हाच मुख्यमंत्री झाले असते असंही त्यांनी म्हटलं. तसंच त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं जे चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी?
सांगायला गेलं तर जुन्या आठवणी खूप आहेत. मी आज छगन भुजबळ यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. मी आज जी लढाई करतो आहे ती माझी एकट्याची नाही. आपल्या सगळ्यांची ही लढाई आहे. एवढंच नाही तर देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना ही स्वातंत्र्यासाठीची दुसरी लढाई आहे. त्यामुळे विचारांची धगधगती मशाल हाती आम्ही घेतली आहे.
भुजबळ जाताना एकटे गेले पण येताना..
मला खरंच आनंद आहे की शिवसेना प्रमुखांचा साथी सोबती परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून का होईना आपल्यासोबत आहे. छगन भुजबळ जाताना एकटे गेले येताना अख्खी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत घेऊन आले. अशा आमच्या छगन भुजबळांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा देतो.
अडीच वर्षांपूर्वी जे समीकरण झालं ते पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला
अडीच वर्षांपूर्वी जे समीकरण झालं ते चांगलं होतं. देशात असा प्रयोग पहिल्यांदा झाला. मंत्रालयात नुसता मजल्यांचा एफएसआय नव्हता तर विचारांचा एफएसआय होता. आपलं चांगलं सरकार पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला. त्यामुळे सरकार पाडून, मलाच सगळं पाहिजे या ईर्ष्येने हे सगळं केलं गेलं. आता हल्ली काहीही झालं की कोर्टात जावं लागतं. हिंमत असेल तर मैदानात या. मैदान मिळू नये म्हणून कसले प्रयत्न करताय असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्या खुमासदार भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपला अनेक चिमटे काढले आणि शिंदे गटाला टोले लगावले आहे.
छगन भुजबळ यांची आणखी एक आठवण
छगन भुजबळ शिवसेनेचे एक आमदार होते तेव्हा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांना फोन करून सांगितलं होतं की एक माणूस पाठवला आहे. पण तो बोलायला लागला की सगळं सभागृह ऐकत असतं. हल्ली कोण काय बोलतं? जाऊदेत. सतत आणि सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा विचाराने राजकारण करणं किती गरजेचं आहे याचा विचारच कुणी करत नाहीये. छगन भुजबळ यांचं एक चांगलं उदाहरण आहे. त्यांचा राजकीय जन्म शिवसेनेत झाला. पहिली निवडणूक हरले होते. आयुष्यातली पहिली निवडणूक हरूनही माणूस जिद्दीने उभा राहिला. बेळगावचा तुमचा फोटो पाहिला तर माझ्यावर पुन्हा हिंदुत्व सोडल्याचा आणखी एक आरोप होईल असं म्हणत पुन्हा भाजपला टोला लगावला.
ADVERTISEMENT