निसर्ग चक्रीवादळानंतर जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये एवढीच अपेक्षा: फडणवीस

मुंबई तक

• 02:59 AM • 21 May 2021

सिंधुदुर्ग: ‘उद्या मुख्यमंत्री कोकणात येत आहेत, तर त्यांनी भरघोस मदत जाहीर करावी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘तौकताई चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील मच्छीमार, आंबा, काजू बागायतदार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या घराचे, बोटींचे मोठे नुकसान […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

सिंधुदुर्ग: ‘उद्या मुख्यमंत्री कोकणात येत आहेत, तर त्यांनी भरघोस मदत जाहीर करावी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे वाचलं का?

‘तौकताई चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील मच्छीमार, आंबा, काजू बागायतदार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या घराचे, बोटींचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीसाठी जिल्ह्यात दाखल होत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची घोषणा करून त्याची तात्काळ पूर्तता करावी.’ अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तौकताई चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची ते स्वत: वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत.

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, भाजपचे माजी आमदार राजन तेली हे सर्व नेते होते. या दौऱ्यात भाजपच्या या नेत्यांनी अनेक ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या आणि नेमकं कशा स्वरुपाचं नुकसान झालं आहे याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची देखील भेट घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे बहुतांशी घटकांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासन आणि सरकार कमी पडले याकडेही विविध मुद्द्यांद्वारे जिल्हाधिकाऱ्यांचे या नेत्यांनी लक्ष वेधले. देवगड तालुक्यात नांगरून ठेवलेल्या बोटी भरकटत जाऊन त्यांचे नुकसान झाले असून दुसरीकडे बोटीवरील खलाशी मृत्युमुखी पडल्याची बाबही गंभीर असून त्यावेळी कोस्ट गार्ड यंत्रणा तैनात असती तर खलाशी मृत्युमुखी पडले नसते. हे जीव वाचविता आले असते याकडे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

याबाबत जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘वादळ सदृश्य परिस्थितीत किंवा आपत्कालीन स्थितीत किंवा जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीत किनारपट्टीवरील कोस्टगार्ड यंत्रणेला अलर्ट ठेवण्यात येईल. तशा सूचना संबंधित विभागांना देण्यात येतील.’ अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण, सावंतवाडी, कणकवली या विधानसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाच्यावतीने कोव्हिड सेंटर उभी राहणार असून भारतीय जनता पक्षातर्फे कोरोना ग्रस्त रुग्णांवर आता उपचार केले जाणार आहेत. म्हणून जिल्ह्यातील तीनही मतदार संघात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जागा उपलब्ध करून दिल्यास कोव्हिड सेंटर भाजपच्यावतीने किंवा आमदार फंड सीएसआर फंड वापरून ते तातडीने सुरू करण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे तातडीने जागा निश्चित करून द्यावी. अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळ येणार हे प्रशासनाला आगाऊ समजले होते यामधे जि.प.ची मदत घेतली गेली असती तर नागरिकांना पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा देण्यासाठी प्रयत्न करता आले असते. पुढील काळात याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यंत्रणा गावपातळीवर सक्षमपणे काम करू शकते व त्यासाठी जिल्हा परिषद सतर्क राहील अशी ग्वाहीही त्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. माजी आमदार राजन तेली यांनी जिल्हा रुग्णालयातील मृत्यूंचे वाढते प्रमाण व कोरोना रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधेतील अडचणींबाबत लक्ष वेधले.

दरम्यान, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी भाजप नेत्यांच्या या बैठकीत चक्रीवादळामुळे झालेले नुकसान तसेच कोरोना साथीबाबतचा आढावा या बैठकीत दिला.

    follow whatsapp