शुभा मुद्गल, ज्येष्ठ गायिका
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांचं गाण्यातलं परफेक्शन आणि त्यांचा मृदू आवाज हा परत होऊ शकत नाही. आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्या आवाजाने मोहिनी घातली. त्या आमच्या कायमच आदर्श आणि गुरूस्थानी राहतील. त्या अत्यंत कठीण गाणी अत्यंत सहजतेने गात असत. तासिर आणि असर हे दोन त्यांच्या गाण्याचे विशेष होते. तासिरचा अर्थ होतो तो म्हणजे आवाज हृदयाला भिडणं किंवा काळजाला हात घालणारा आवाज असणं. तर असरचा अर्थ होतो की ते गाणं तुमच्यावर कसा परिणाम करतं. या दोन्ही गोष्टी लताजींना अवगत होत्या.
लता मंगेशक यांचं गाणं हे प्रेमगीत असो किंवा त्यात करूणरस किंवा ते भक्तीगीत असो ते हृदयाला भिडणारं ठरायचं. त्यांच्या आवाजातली ती जादू होती. त्यांनी देशभक्तीपर गाणीही गायली ती आजही आपल्या तोंडावर आहेत. ती गाणी म्हणणं सोपं नाही. तरीही त्या खूप सहजतेने गात असत. लताजींनी गायलेलं प्रत्येक गाणं संगीत किंवा गाणं यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी, ते शिकणाऱ्यांसाठी एखाद्या पुस्तकासारखं आहे. त्यातून वैविध्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात.
लता मंगेशकर यांनी त्यांच्या गाण्यात घेतलेला आलाप, त्यांनी घेतलेली तान हा सखोल अभ्यासाचा विषय आहे. ते शिकता येणं खूप कठीण आहे. लता मंगेशकर यांनी अशी अनेक गाणी म्हटली आहेत जी म्हणणं खूपच कठीण आहे. पण त्यांच्या आवाजातली सहजता त्या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. आज त्यांची अनेक गाणी मला आठवत आहेत.
लतादीदींना अलौकिक आवाजाची, सूरांची देणगी लाभली होती. असा आवाज कैक पिढ्या झाला नव्हता आणि यापुढेही कधीच होणार नाही. वयानुरूप त्यांचा आवाज बदलत गेला जे होणं अत्यंत नैसर्गिक आहे. तरीही त्यांचं गाण्यातलं परफेक्शन हे खूप जबरदस्त होतं. आरोह-अवरोह घेणं, त्यातले बारकावे टिपणं, उच्चार हे सगळंच त्यांच्या गाण्यात अगदी ओघवतं येतं. एखादं गाणं अगदी साधं जरी असेल तरीही ते लतादीदींनी गायलं म्हणून त्या गाण्याला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला. त्यांच्यासोबत काम केलेल्या संगीतकारांनाही लतादीदींची ताकद कळली होती. त्यामुळेच त्या जे गात असत ते प्रत्येक गाणं अजरामर झालं आहे.
BLOG : ‘….पुन्हा लता मंगेशकर होणे नाही’
लता मंगेशकर यांच्यासारख्या एका अत्यंत हुशार आणि तल्लख गायिकेकडून गाणं म्हणून घेणं हा संगीत दिग्दर्शकांसाठीचा कसोटीचा काळ होता असं मला वाटतं. कारण त्यांनी ज्या ज्या गाण्याला आवाज दिला त्या गाण्याचं सोनं झालं. त्यांच्या आवाजात परीसस्पर्शाची जादू होती असंच मला वाटतं. त्यांच्या गाण्यात एक सळसळता उत्साह होता. वयानुसार त्यात काहीसे बदल झाले. पण त्यांनाही त्याची कल्पना होती त्यामुळे त्यांनी गाण्यांची निवडही तशाच प्रकारे केली होती.
चेहऱ्यावरचं सुमधुर हास्य आणि तितकाच गोड आवाज हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य होतं. त्या एखाद्या कार्यक्रमात बोलल्या किंवा गाणं म्हटलं तरीही ते अत्यंत मृदू वाटत असे. याचं कारण त्यांच्या स्वभावता विनम्रपणा होता. लता मंगेशकर यांच्यासारख्या गायिका कधीही झाल्या नव्हत्या त्या एकमेव अद्वितीय आहेत, लता मंगेशकर पुन्हा होणार नाहीत.
लतादीदींचं कोणतं गाणं मला आज आठवतं हा खरंतर कठीण असा प्रश्न आहे. इतकी त्यांची गाणी माझ्या मनात रूंजी घालत आहेत. मात्र आवर्जून आठवतं आहे ते हे की त्या पंडित रविशंकर यांनी संगीत दिलेल्या अनुराधा या सिनेमातलं गाणी मला आज आठवत आहेत. हाये रे वो दिन या गाण्यातलं जे हाये आहे तसं ते फक्त लतादीदी गाऊ शकतात. तशी जागा घेणं कुणालाही जमेल असं मला वाटत नाही. ते माझं आवडतं गाणं आज मला सारखं सारखं आठवतं आहे. आज त्या आपल्यात नाहीत याची खंतही वाटते.. अश्रू दाटून येत आहेत.
ADVERTISEMENT