अमरावती : आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू या वादाचा मंगळवारी शेवट होण्याची शक्यता आहे. रवी राणा यांनी माफी मागितल्यानंतर आज अमरावतीमधील टाउन हॉल जवळील नेहरू मैदानावर बच्चू कडू यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत दिव्यांग व्यक्ती आमची भूमिका स्पष्ट करेल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी तयार केलेला सस्पेन्स अखेर मंगळवारी संपण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
मात्र या सभेपूर्वी सभास्थानी वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लावून बच्चू कडू यांच्याकडून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. यात मै झुकेंगा नही” असे बॅनर लावून आमदार रवी राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. दिलगिरी व्यक्त करायला लावून या वादात एक प्रकारे बच्चू कडू यांचा विजय झाल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना माघार घ्यावी लागली नाही, तर रवी राणा यांना माघार घ्यायला लावली असही कार्यकर्ते म्हणाले. तसंच बच्चू कडू यांच्याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी काय म्हटलं आहे, हे लिहित रवी राणा यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
कोणता नेता बच्चू कडू यांच्याबद्दल काय म्हणाला?
-
हे माझे सवंगडी गेली अनेक वर्ष माझ्यासोबत काम करत आहेत. ४० आमचे आणि १० अपक्ष आमदार हे सगळे एका भुमिकेतुन माझ्यासोबत आले. पैशांच्या लालसे पोटी एकही आमदार माझ्यासोबत आलेला नाही – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
-
सरकार बनवतोय, मदत पाहिजे, माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहटीला गेले. बच्चू कडुंवर आरोप करणं चुकीचं आहे – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.
-
बच्चू कडु संवेदनशील मनाचे राजकारणी आहेत. त्यांनी अपंग व आरोग्य क्षेत्रात प्रचंड काम केले आहे – सुप्रिया सुळे, खासदार.
-
बच्चू कडु हे चळवळीतील कार्यकर्ते, चळवळीतील कार्यकर्त्याबद्दल अशी चिकलफेक करणे योग्य नाही – राजू शेट्टी, शेतकरी नेते.
-
बच्चू कडू हे चांगले दिलदार आहेत. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा केला आहे – किशोरीताई पेडणेकर, माजी महापौर, मुंबई मनपा.
-
दिव्यांग, मजूर, अनाथांसाठी लढणारा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून बच्चू कडूंची ओळख महाराष्ट्रात आहे – सतेज पाटील, आमदार.
कडू विरुद्ध राणा – वाद काय होता?
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केल्यानंतर कडू आणि राणा यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली. ५० खोके कुणी घेतले आणि कुणी दिले याचे पुरावे द्यावेत अन्यथा १ नोव्हेंबरला व्हिडीओ बाहेर आणू, असा इशारा दिला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा वेगळा विचार करू असंही कडू म्हणाले होते.
ADVERTISEMENT