कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी प्रचंड मोठ्या मताधिक्याने भाजपच्या सत्यजित कदम यांच्यावर विजय मिळवला आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधवांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ज्यामध्ये महाविकास आघाडीने एकत्रपणे ही निवडणूक लढवत भाजपला पराभवाची धूळ चारली. मात्र, या सगळ्यात चर्चा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या एका शब्दाची कोल्हापुरात चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना यावेळी तब्बल 96,226 मतं मिळाली. तर भाजपचे सत्यजित कदम यांना 77,426 मतं मिळाली. त्यामुळे या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा तब्बल 18,800 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पण यात महत्त्वाचा भाग म्हणजे यावेळी शिवसैनिकांनी देखील काँग्रेसला भरभरुन मतदान केल्याचं समजतं आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण 2019 साली तेव्हाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला होता. त्यामुळे जेव्हा इथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती तेव्हा शिवसेनेने आपला उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरु लागली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांना मुंबईत बोलावून आपण काँग्रेसला शब्द दिला आहे आणि तो पाळला पाहिजे असं सांगून कामाला लागण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन सभा घेऊन शिवसैनिकांना थेट आवाहन केलं होतं की, त्यांनी काँग्रेसला मतदान करावं. त्यांचा हाच शब्द शिवसैनिकांनी देखील पाळला असल्याचं निकालातून पाहायला मिळालं आहे.
पाहा कोल्हापूरच्या प्रचारसभेत काय म्हणालेले मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे म्हणालेले.. काँग्रेसला मतदान करणार का? होय करणारच..
‘2014 कोल्हापूरच्या मतदारसंघात 40 हजार मतं पडली होती. 2019 ला पुन्हा एकदा भाजपने आपल्याशी युती केली होती. तेव्हा इथं आपल्याला अधिक मतं मिळायला हवी होती. पण भाजपच्या या मतांपैकी फक्त 5-6 हजारं मतं मिळाली. उरलेली मतं गेली कुठे?’
‘आज आपण जयश्री ताईंचा प्रचार करतो आहोत. त्या आपल्या उमेदवार आहेत आणि त्या निवडून येणार हे नक्की आहेच. कारण शिवसेना हा समोरुन वार करतो. पाठीत वार करत नाही. आम्ही होय तर होय म्हणतो.. आणि एकदा का होय म्हटलं की, खरं करुन दाखविण्यासाठी वाट्टेल ते करु.’
‘2019 च्या निवडणुकीत इथे शिवसेनेचा पराभव झाला. भाजपची 40 हजार शिवसेनेला मिळाली असती तर 1 लाख 10 हजार मतं शिवसेनेला मिळाली असती. 2014 मध्ये काँग्रेसची जी मतं 47 हजार होती ती 91 हजार झाली. मग ही 40 हजार मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावरुन?’
कोल्हापूर: शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का?, CM उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
‘आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? हो देणारच.. गेल्या वेळी तुम्ही छुपं मत दिलं होतंत की नाही. याचा खुलासा कोण करणार? तुम्ही छुपं काम करता.. आम्ही देशाच्या राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणे करतो. पाठिंबा देतो तो उघडपणाने देतो. विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने. हे लपूनछपून करणारी जातकुळी आमची नाही.’
‘नानां’च्या प्रचाराला ‘फडणवीस’ येऊन गेले, मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा टोमणा
‘आमच्या जी टीका करता तुम्ही काँग्रेससोबत तुम्ही गेलात शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? होय करणार.. कारण आम्ही नाटक नाही करत.. पण काँग्रेससोबत जाणं हे पाप असेल तर मेहबुबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये जे बसला होतात ते काय पुण्य होतं तुमचं? मेहबुबा मुफ्ती काय वंदे मातरम, भारतमाता की जय म्हणत होत्या? पण सत्तेसाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेलात. तिथेच तुमचं हिंदुत्व वैगरे भ्रष्ट झालं.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यावेळी म्हणाले होते.
ADVERTISEMENT