महिला कॉमेडियन भारती सिंह तिच्या अफाट टायमिंग सेन्ससाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून भारती सिंहचा एक व्हीडिओ व्हायरल होतो आहे. यावेळी तिने जोक सांगत असताना दाढी मिशी असणाऱ्यांची खिल्ली उडवली होती. मात्र हा जोक करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
भारती सिंहने दाढी-मिशांवरून एक जोक क्रॅक केला. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. यानंतर तिच्याविरोधात अमृतसर या ठिकाणीही निदर्शनं करण्यात आली. तसंच या प्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यात येईल अशी चर्चा रंगली होती. आता तिच्या विरोधात कलम २९५ ए अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाली होती भारती?
अभिनेत्री जस्मीन भसीन भारतीच्या कॉमेडी शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणून आली होती. या शोमध्ये भारतीने गंमतीत दाढी मिशी असावी की नसावी असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी ती म्हणाली की दूध पिताना जर तोंडात दाढी आली तर शेवयांची सवय येते. माझे अनेक मित्र आहेत ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे. हे दिवसभर दाढी मिशीतील उवा काढण्यातच दिवस घालवतात. असं ती गंमतीने म्हणताना दिसतं आहे. मात्र हाच व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तसंच यानंतर भारतीविरोधात तक्रारही दाखल झाली आहे.
भारतीने मागितली माफी
भारतीचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि तिच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर भारतीने या प्रकरणी माफी मागितली आहे. मी कोणत्याही धर्माविषयी नाव घेऊन दाढी मिशांवर भाष्य केलं नव्हतं. मी स्वतः पंजाबी आहे, मला पंजाबी धर्माविषयी आणि देशातल्या प्रत्येक धर्माविषयी आदर आहे. मी जे वक्तव्य केलं त्यात फक्त विनोद करणं एवढाच उद्देश होता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते असं म्हणत भारतीने इंस्टाग्रामवर व्हीडिओ पोस्ट केला आहे.
ADVERTISEMENT