सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वांद्रे येथील मेट्रोपोलिटियन मॅजिस्ट्रेट कोर्टात त्यांच्या सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा या सिनेमाविरोधात ही याचिका दाखल कऱण्यात आली आहे. क्षत्रीय मराठा सेवा संस्था यांनी ही तक्रार याचिका दाखल केली आहे. महेश मांजरेकरांनी त्यांच्या नवीन सिनेमात महिला आणि लहान मुलांचं आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने महेश मांजरेकर यांच्याविरोधातही वांद्रेतील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यादरम्यान, आयपीसीच्या कलम 292 (अश्लील सामग्रीची विक्री इ.), 295 (अश्लील कृत्ये किंवा शब्दांसाठी शिक्षा), 34 अंतर्गत मांजरेकरांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती.
महेश मांजरेकर यांच्यासह नरेंद्र, श्रेयांश हिरावत आणि ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचे निर्माते एनएच स्टुडिओज यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत.
दिवंगत लेखक जयंत पवार यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित झाला. त्यापूर्वी 10 जानेवारीला त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यात दाखविण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृष्यांवरून चित्रपटावर सर्वत्र टीकेची झोड उडाली. संघटनेने या चित्रपटाविरुद्ध गंभीर भूमिका घेत ही याचिका दाखल केली आहे.
महेश मांजरेकर यांनी चाळ संस्कृतीवर आधारीत जे चित्रपट दिग्दर्शित केले त्यात चाळीतलं वातावरण भडक आणि काहीसं उत्तानच दाखवण्यात आलं आहे. वास्तव, प्राण जाये पर शान न जाए, लालबाग पऱळ हे सिनेमा पाहिल्यावर त्यातला भडकपणा काय ते लक्षात येतं. आता नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरच लोकांनी फारकत घेतली होती. महिला आयोगानेही यासंदर्भातली दखल घेतली. तरीही हा सिनेमा ही दृश्य वगळून चित्रीत झाला. मात्र आता यात लहान मुलांचा आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप महेश मांजरेकर यांच्यावर करण्यात आला आहे.
१४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं पोस्टर महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात रिलीज केलं होतं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर यातील काही भडक दृष्यांची चर्चा झाली. या दृष्यांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एक महिला आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले आहेत. अनेकांनी याविषयी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. यावरूनच वाद झाल्यानंतर ही दृश्य वगळून सिनेमा प्रदर्शित करण्यात आला.
ADVERTISEMENT