नवीन वर्षात राज्यात कोरोना विषाणूवर लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सर्वांचा काहीसा भांड्यात पडला होता. परंतू अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह अमरावती, अकोला, यवतमाळ यासारख्या शहरांमध्ये निर्बंध कडक केले आहेत.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने कोणत्या शहरात लॉकडाउन जाहीर केलंय आणि कोणत्या शहरात निर्बंध कडक केलेत याचा आपण आढावा घेणार आहोत.
१) अमरावती जिल्ह्यात विकेंड लॉकडाउन –
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळावं यासाठी अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. यात दर आठवड्यातील शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी आठपर्यंत सर्व बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
२) यवतमाळमध्येही लॉकडाउनची घोषणा –
अमरावतीसोबतच यवतमाळमध्येही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिलेत. सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे असं जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलंय. या काळात ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून धार्मिक यात्रा, समारंभ, महोत्सव यात आखून दिलेले नियम व ठरवून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटि दर हा ३२ टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटि दर २४ टक्के आहे. यानंतर जिल्हाप्रशासनाने कोरोनाचे निर्बंध कडक केले असून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. अकोल्यात अद्याप लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली नसली तरीही येत्या काही काळात नागरिकांकडून सहकार्य न मिळाल्यास जिल्हा प्रशासन लॉकडाउन लावण्याच्या विचारात आहे.
बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून जिल्हा प्रशासनाने या भागांत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. येत्या काळामध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही आणि नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर बुलडाणा आणि वाशिममध्येही लॉकाडाउन लावले जाण्याचे संकेत मिळत आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत.
बुलडाण्यासोबत वर्धा जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी संध्याकाळी सात वाजल्यानंतर सर्व दुकानं बंद करण्यात येणार असून यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत वर्ध्यातील सर्व शाळा, कॉलेज बंद राहणार असून लग्न सोहळ्यातही फक्त ५० माणसांना परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक यात्रांवरही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचा भंग करणाऱ्या दुकानांना तात्काळ सिल लावण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांना ५०० रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT