राजकारणी कधी कोणत्या कारणामुळे चर्चेत येतील याचा काही नेम नसतो. अनेकदा अनावधनाने आपल्या हातून झालेल्या एका कृतीमुळे राजकारण्यांना टीकेचं धनी व्हायला लागतं. नागपूर महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवर रमेश पुणेकर यांना सध्या अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.
ADVERTISEMENT
नागपूर शहरात कचरा संकलन करणाऱ्या दोन खासगी कंपन्यांच्या कारभारासंदर्भात महापालिकेची विशेष ऑनलाईन सभा बोलावण्यात आली होती. या सभेत कचरा संकलन करणाऱ्या दोन कंपन्यांच्या कारभारासंदर्भात चौकशी अहवाल मांडला गेला. या अहवालावर एकीकडे चर्चा सुरु असताना काँग्रेस नगरसेवर रमेश पुणेकर मात्र आपल्या धुंदीत सिगरेटचे झुरके ओढत होते. पुणेकर आपल्या नाईक तलाव येथील कार्यालयातून या सभेसाठी सहभागी झाले होते. सिगरेटचा धूर हवेत सोडताना पुणेकर यावेळी कॅमेऱ्यात कैद झाले.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर नागपूर शहरात काँग्रेस नगरसेवकाच्या अनोख्या अंदाजाची चर्चा सुरु झाली. पुणेकर यांनी याविषयावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. परंतू फोनवरुन आपली प्रतिक्रीया देत असताना, कॅमेरा सुरु होता हे माझ्या लक्षात आलं नाही आणि त्यातूनच आपल्या हातून अनावधानाने ही चूक झाल्याचं पुणेकरांनी मान्य केलं.
धुम्रपान करण्यावर बंदी नसली तरीही धुम्रमान कुठे करावं याचे काही अलिखीत नियम आहेत. त्यामुळे अशाप्रकारे जर लोकप्रतिनिधींनी ऑनलाईन सभेमध्ये अशा प्रकारचं वर्तन करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता नागपूरमध्ये विचारला जात आहे.
ADVERTISEMENT