नागपूर: काँग्रेस नेते शेख हुसैन यांनी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याप्रकरणी नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हुसैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी काल रात्री कलम 294 (अश्लील कृत्य) आणि 504 IPC (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
ADVERTISEMENT
शेख हुसैन हे नागपुरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही होते. नागपूरमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान बोलताना शेख हुसैन यांचा तोल ढळला आणि त्यांनी पंतप्रधानांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.
‘भारतात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे अशा बेरोजगारांना त्यांनी त्यांना रोजगार देण्याचं काम करावं. शेतकऱ्यांचे प्रश्न संपवण्यासाठी काम करावं. निरुपयोगी गोष्टी करणे थांबवा. तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काही झाले तर देशात वणवा पेटेल. असं शेख यावेळी म्हणाले.
याचवेळेस त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह भाष्यही केलं. जेव्हा शेख यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा राज्य सरकारचे दोन मंत्रीही व्यासपीठावर हजर होते. त्यांनी यावेळी शेख हुसैन यांना रोखण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केल्याच्या निषेधार्थ देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसकडून सध्या आंदोलन करण्यात येत आहे.
शेख हुसैन हे 15 वर्षांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. पण तरीही मंचावर बोलण्याची त्यांना संधी देण्यात आली आणि तेव्हाच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांना रोखता आले असते पण त्यांनी हुसैन यांना रोखलं नाही.
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, ‘हे फक्त वादग्रस्त शब्द नाहीत. उलट धमकी आहे. काँग्रेसचे लोक रस्त्यावर हिंसक होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. हा काँग्रेसचा सत्याग्रह आहे का? दिल्लीत जाळपोळ करणे आणि बॅरिकेड्स तोडणे कितपत योग्य आहे. राहुल गांधी ईडीसमोर गप्प आहेत.’ असं म्हणत शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
पाहा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय म्हणाले
त्याचवेळी या संदर्भात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या विधानाची माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. आमचे सरकार जे चुकीचे आहे त्याला चुकीचंच मानतं त्यामुळेच वादग्रस्त वक्तव्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस आपले काम करतील. पण नुपूर शर्मा यांच्या विधानाच्या बाबतीत जे अरब देश आमच्या मूल्यांचे कौतुक करायचे तेच आज आमच्या विरोधात उभे ठाकले आहेत. एवढेच नाही तर आपल्या देशाला अरब देशांची माफी देखील मागावी लागली आहे.
ADVERTISEMENT