राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अखेर निवडणूक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १९ ऑक्टोबरला काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कोण लढवणार यावरून आता वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. सुरूवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आलं होतं. आता खासदार शशी थरूर यांच्या नावाची चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणूक कार्यक्रमानुसार १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून, १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे काँग्रेसचं अध्यक्षपदावर पुन्हा गांधी कुटुंबातील व्यक्ती बसणार की, बाहेरचा याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरूर यांचं नाव का चर्चेत आलंय?
अशोक गेहलोत यांनी अध्यक्ष व्हावं, अशी सोनिया गांधी यांची इच्छा असल्याची माहिती समोर आली होती. गेहलोत यांनी मात्र, राहुल गांधींनी ही जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका मांडली. गेहलोत यांच्याभोवतीची चर्चा थांबण्याआधीच काँग्रेसचे केरळातील खासदार शशी थरूर यांचं नाव चर्चेत आलं.
काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळणार? अशोक गेहलोत यांची का होतेय चर्चा?
खासदार शशी थरूर यांनी एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल भाष्य केलंय. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणात निवडणूक व्हावी, असं शशी थरूरांनी लेखात म्हटलंय. या लेखामुळे शशी थरूर हे निवडणूक लढवण्याचे संकेत देत असल्याचं बोललं गेलं.
काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याबद्दल शशी थरूरांची भूमिका काय?
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव घेतलं जात असल्यानं शशी थरूर यांनी भूमिका मांडली. थरूर म्हणाले, “लोकांना हवा तसा विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी माझ्या लेखातून फक्त इतकंच म्हणालो की, पक्षात निवडणूका योग्य आहेत.”
पुढे बोलताना थरूर म्हणाले, “एका लोकशाही देशात लोकशाही असणारी पक्ष असणं आवश्यक आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे, हा स्वागत करण्यासारखा निर्णय आहे. मला वाटलं नव्हतं की, माझ्या लेखावरून इतके अंदाज बांधले जातील. मी अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. सध्या तरी या मुद्द्यावर मी काहीही म्हणू इच्छित नाही”, असं शशी थरूर यांनी सांगितलं.
ना राहुल ना सोनिया, काँग्रेसला मिळणार गैर गांधी अध्यक्ष?, ही नावं चर्चेत
जितके जास्त उमेदवार असतील, तितकं काँग्रेससाठी चांगलं -थरूर
“काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीला काही आठवड्यांचा अवधी आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची वाट बघूया. मी माझ्या लेखात फक्त इतकंच म्हटलंय की, जितके जास्त उमेदवार असतील, तितकं पक्षासाठी चांगलं असेल. शेवटी एकाच व्यक्तीला विजयी घोषित केलं जाईल. शेवटी जास्त उमेदवार असल्यामुळे प्रक्रिया विश्वासार्ह ठरेल आणि चर्चेत राहिल”, अशी भूमिका शशी थरूर यांनी मांडली.
“प्रियंका गांधी चांगल्या उमेदवार ठरू शकतात”
काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीबाबत काँग्रेस नेते राशिद अल्वी म्हणाले, “काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी या चांगल्या उमेदवार ठरतील. पक्षाला सोबत घेण्याबद्दल त्यांना चांगली माहितीये. कार्यकर्त्यांसोबत त्यांचा सुसंवाद आहे. त्यांना स्थानिक पातळीवर काम करताना मी त्यांना बघितलं आहे”, असं अल्वी म्हणाले.
ADVERTISEMENT