पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. काँग्रेसने कोरोनाच्या काळात मजुरांना परत पाठवून उत्तर प्रदेशात कोरोना पसरवला, असं मोदी म्हणाले होते. या विधानावरून काँग्रेसकडून माफीची मागणी केली जात असतानाच भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मोदी कुणाचीच माफी मागणार नाही, असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या कामावर मोदींनी निशाणा साधला. काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना काळात मुंबईतील रेल्वे स्टेशनवर कामगारांना मोफत तिकीटं वाटली आणि त्यांना परत पाठवलं. कामगारांना परत पाठवून उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये कोरोना पसरवला, असा आरोप मोदींनी केला.
वांद्रे स्थानकावर मजुरांची गर्दी काँग्रेसने जमवली होती?; पोलिसांनी कुणाला केली होती अटक?
पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. केलेल्या विधानाबद्दल मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलनंही केली जात आहे. पुणे काँग्रेसकडून आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी गिरीश बापट यांच्या घराबाहेर भाजपचेही नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी संवाद साधला. “कधीही कोणत्याही राजकीय पार्टीला आंदोलनाबाबत विरोध करीत नाही. लोकशाही पद्धतीने आंदोलनं झाली पाहिजे. माझ्या घराबाहेर देखील आमचे कार्यकर्ते जमले होते. काही करायचे नाही, असे त्यांना मी सांगितलं. तसेच काँग्रेसच्या आंदोलनामध्ये 20 ते 25 पण कार्यकर्ते नव्हते. दुर्दैवाने काही गडबड झाली असती. तर आम्ही जशास तसे उत्तर दिले असते”, असं बापट म्हणाले.
‘कोरोना लाटेत काँग्रेसवाल्यांनी फक्त 500-1000 लोकांनाच फ्री तिकिटं दिली, पण…’, पाहा PM मोदी काय म्हणाले
काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या मागणीवरबद्दलही बापट यांनी भूमिका मांडली. “मोदी अजिबात कुणाचीच माफी मागणार नाहीत. मोदींनी मुंबईचं जे उदाहरण दिलं आहे, ते खरं असून ज्या पद्धतीनं कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलं. त्यामुळे मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली. त्या सर्व कामगारांची काळजी अगोदरच केंद्र सरकारनं घेतली होती. कोरोना काळात केंद्र सरकारला सहकार्य न केल्यामुळे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी,” असं बापट यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT