सेनेने घेतलेली भूमिका ‘अनाकलनीय’; द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

ऋत्विक भालेकर

• 09:51 AM • 13 Jul 2022

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून फटकारले आहे. शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांशी चर्चा करुन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता या निर्णयावर काँग्रेसचे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून फटकारले आहे. शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांशी चर्चा करुन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

ट्विटमध्ये बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) काय म्हणाले?

”राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.”

”शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार?”

”शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे.”

”शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही.”

राष्ट्रवादीची भूमिका काय?

दरम्यान महाविकास आघाडीतील आणखी एक मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेच्या या निर्णयानंतरही राज्यातील युती कायम राहावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शिवसेना प्रत्येक राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांची वैयक्तीक भूमिका घेत असते. हा पाठिंबा त्यांनी एनडीएला दिला नसून द्रौपदी मुर्मू यांना दिलेला आहे.

वैयक्तीक पातळीवर भूमिका घेताना आमच्यावर निर्बंध असू शकत नाहीत. त्यांच्या निर्णयामध्ये आघाडींच्या मित्रपक्षांनी हस्तक्षेप करायचा नसतो. परंतु द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यापुर्वी शिवसेनेने आमच्याशी चर्चा केली नव्हती असे पाटील म्हणाले.

    follow whatsapp