कोरोना संसर्गामुळे समाजातला स्नेहभाव, माणुसकी जवळपास संपल्याचं काही घटनांवरून दिसतं आहे. एवढंच नाही तर सख्ख्या नात्यांमध्ये आपलेपणाची भावनाही काहीशी संपली आहे असंही काही घटना सांगतात. असाच नात्यातला दुरावा एका 76 वर्षांच्या आजीबाईंच्या जीवावर बेतला असता पण नशीब बलवत्तर म्हणून त्या वाचल्या. या आजीबाईंना मृत समजून सरणावर ठेवण्यात आलं होतं. चितेला अग्नी दिला जाणार एवढ्यात त्यांनी डोळे उघडले.
ADVERTISEMENT
काय घडली घटना?
बारामती तालुक्यातल्या मुढाळे गावात 20 दिवसांपूर्वी एका 76 वर्षीय आजीबाईंना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे आजीबाई घरातच विलगीकरणात होत्या. वृद्धापकाळामुळे शरीर प्रकृती साथ देत नव्हती. हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे घरातील सदस्यांनाही आजीबाईंची सेवा कशी करावी, याबाबत कोडे पडले होते. संपर्कात जावे तर कोरोनाची बाधा होण्याची भीती नातेवाईकांनी होती. त्यामुळे थोडे अंतर राखून सेवा चालू होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती अधिक खालावली. आजीबाई डोळेसुद्धा उघडत नाहीत, हे पाहून घरातल्या सदस्यांनी त्यांना उपचारासाठी बारामतीला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला.
वाहनातून घेऊन जाताना आजीबाईंनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दवाखान्यात दाखल करावे; तर बेड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत आजीबाई निपचित पडून राहिल्यामुळे वाहनातल्या सदस्यांना वाटले आजीचं निधन झालं. तेथूनच पाहुण्यांना फोन केले. निधन वार्ता कळवली. वाहन घरी आलं आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली. कोरोनाबाधित असल्यामुळे फार कोणी जवळ गेलं नाही. सरणावर ठेवल्यानंतर मुखाग्नी देण्याची तयारी सुरु होती. मात्र, आजूबाजूला नातेवाइकांची आर्त हाक ऐकून आजीबाईंनी अचानक डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
कोरोनाशी गेल्या अनेक दिवसांपासून झुंज देत असलेल्या आजी जिवंत असल्याची घटना सर्वांना कळवली. नातेवाईकांना या आश्चर्यकारक घटनेमुळे आनंद तर झालाच, पण आजीला जिवंतपणीच मरण यातना दिल्याने मनस्ताप देखील झाला.
कोरोनाच्या संसर्गामुळे एकमेकांना स्पर्श करणे धोक्याचं ठरत असल्याची भावना आपल्या प्रियजनांना एकमेकांपासून दूर करत आहे. कोरोना संसर्गामुळे मृत झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक देखील पुढे येत नाहीत. कोणी तयारी दाखवलीच तर लवकर अंत्यसंस्कार करून मोकळे व्हावं, अशा विचारातून आजीबाईंबाबत घाई अंगलट आली असती.
ADVERTISEMENT