कोरोनाच्या प्रादूर्भावाचा सामना करण्यासाठी सरकार आणि वैद्यकीय यंत्रणा लसीकरणाचा वेग कसा वाढवता येईल यावर भर देत आहेत. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर रुग्णाच्या मृत्यूची शक्यता ही जवळपास कमी होऊन जाते. परंतू मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचं लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही निधन झालं आहे. ४८ वर्षीय हेड कॉन्स्टेबल संदीप तावडे असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते दहीसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
ADVERTISEMENT
ड्युटीवर असताना संदीप तावडे यांना कोरोनाची लागण झाली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टात ते ड्युटीवर असायचे. दहीसर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी तावडे यांनी पहिला डोस घेतला होता. यानंतर १३ मार्च दरम्यान त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. २१ एप्रिल रोजी तावडे यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतर त्यांना सुरुवातीला दहीसरच्या कोविड सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आलं. परंतू तब्येतील सुधारणा होत नसल्यामुळे दोन-तीन दिवसांमध्ये तावडे यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं.
तावडे यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मधुमेहाचा त्रास होता. सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर सुरुवातीला त्यांना ICU वॉर्डात ठेवण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांची तब्येत सुधारली. यानंतर त्यांना परत जनरल वॉर्डात हलवण्यात आलं, परंतू यानंतर त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना ICU मध्ये शिफ्ट करण्यात आलं अशी माहिती दहीसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली. तावडे यांची पत्नी आणि मुलाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.
ADVERTISEMENT