नियम फक्त सामान्यांसाठी? माजी शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

मुंबई तक

• 02:51 AM • 04 Apr 2021

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना लॉकडाउनचा इशारा दिला. दोन दिवसांत मला या गोष्टीवर पर्याय मिळाला नाही तर मी पूर्णपणे लॉकडाउन लावेन असं मुख्यमंत्री म्हणाले. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्री सर्वसामान्य लोकांना मास्क घाला, सार्वजनिक ठिकाणी […]

Mumbaitak
follow google news

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना लॉकडाउनचा इशारा दिला. दोन दिवसांत मला या गोष्टीवर पर्याय मिळाला नाही तर मी पूर्णपणे लॉकडाउन लावेन असं मुख्यमंत्री म्हणाले. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्री सर्वसामान्य लोकांना मास्क घाला, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन करत आहेत. परंतू हे सर्व नियम फक्त सर्वसामान्यांपूरतेच आहेत की काय असा प्रश्न आता पडायला लागला आहे. कारण कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीच्या लग्नात बिनदिक्कतपणे कोरोनाच्या सर्व नियमांचं उल्लंघन करण्यात आलं.

हे वाचलं का?

कल्याण पश्चिमेकडील काळा तलाव परिसरात असलेल्या मॅरेज लॉनमध्ये वायले यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला शेकडो लोकांची गर्दी जमा झाली होती. अशावेळी सोशल डिस्टन्सिंग सोडाच…पण लग्नसोहळ्यासाठी आलेल्या एकाही व्यक्तीने साधा मास्कही घातलेला दिसत नव्हता. एकीकडे कल्याण-डोंबिवली परिसरात सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये रात्री आठ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनीधींच्या सोहळ्यांना नियम डावलून परवानगी कशी मिळते याबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला अशाच पद्धतीने रात्री बारा वाजता, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ज्यात नगरसेवकाची मिरवणूक काढण्यात आली. इथेही सोशल डिस्टन्सिंग आणि विनामास्क आलेल्या कार्यकर्त्यांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतल्या लोकप्रतिनीधींना सामाजिक भान कधी येणार असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! शिवसेना नगरसेवकाचं नियम धाब्यावर बसवून बर्थ-डे सेलिब्रेशन

    follow whatsapp