गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून राज्य शासनाने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. तरीही अनेक भागांमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. या परिस्थितीशी झुंज देताना आजही अनेक भागांत औषधं आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येताना दिसतो आहे. बीडमध्ये मंगळवारी ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या आठही रुग्णांवर अंबाजोगाई नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. या आठही रुग्णांना एकाच चितेवर ठेवून चितेला अग्नी देण्यात आला. यावरुन सध्या प्रशासकीय यंत्रणेवर असलेला ताण लक्षात येत आहे.
ADVERTISEMENT
‘शेजारील राज्यांकडून Oxygen चा पुरवठा केला जावा’, महाराष्ट्रावर का ओढावलीय अशी वेळ?
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन या मोहीमेअंतर्गत अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. परंतू अनेक ठिकाणी विषाणूच्या जास्त प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर प्रशासकीय यंत्रणा स्वतःच अंत्यसंस्कार करत आहेत. बीड जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात ७१६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मंगळवारी १० रुग्णांनी आपले प्राण गमावले ज्यातील ८ रुग्ण हे अंबाजोगाई भागातले होते.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता आरोग्य यंत्रणेवरही चांगलाच ताण जाणवतो आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये औषधांचा आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवतो आहे. सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमिडेविसीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. आपल्या रुग्णांसाठी इंजेक्शन घेण्यासाठी सोलापूर शहरात मेडीकल बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.
सोलापुरातील नावाजलेल्या हुमा मेडीकल दुकानाबाहेर नागरिकांनी रात्री ९ वाजेपासून रांगा लावल्या होत्या. १२ वाजता इंजेक्शनचा स्टॉक येणार असल्यामुळे आपल्या नातेवाईकांना योग्य वेळेत इंजेक्शन मिळावं आणि यात उशीर होऊ नये यासाठी अनेक लोकं ३-४ तास रांगेत उभी होती. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर दिवसेंदिवस ताण येताना दिसतो आहे. शासकीय रुग्णालयात औषधसाठा पुरेसा असला तरीही रेमिडेविसीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यामुळे सोलापुरात बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय.
‘ब्रेक द चेन’ ला सरकारमधून विरोध, अमरावतीत निर्बंध शिथिल करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी
ADVERTISEMENT