एकीकडे राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. सामान्य जनतेपासून ते उद्योगधंद्यांसाठी सरकारने नवे नियम आणि निर्बंध घालून दिले आहेत. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेवर गेल्या काही दिवसांपासून किती ताण येतो आहे याचं चित्र नागपुरात पहायला मिळतंय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी रात्री एकाच बेडवर कोविड-नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं धक्कादायक चित्र पहायला मिळालं. नागपुरात दर दिवशी वाढत असलेली रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण यामुळे शहरात रुग्णांवर उपचारासाठी बेडच उपलब्ध नसल्याचं पहायला मिळतंय. नागपुरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना वॉर्डात बेड रिकामे नसल्यामुळे दोन रुग्णांना सामान्य वॉर्डात एकाच बेडवर संपूर्ण रात्र काढावी लागली.
ADVERTISEMENT
कोरोनाची लागण झाल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण परिस्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेत आहेत. परंतू शहरात बेडची कमतरता भासत असल्यामुळे रुग्णांसमोर नवीन संकट तयार होताना दिसत आहे. शनिवारी रात्री नागपुरातील दोन पेशंटवर सामान्य वॉर्डात उपचार करण्यात आले. यावेळी बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसवरही ताण दिसत होता. त्यातच सामान्य वॉर्डात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही तपासणी झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत बेड मिळत नसल्यामुळे त्यांच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या.
यासंदर्भात ‘मुंबई तक’ने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अविनाश गावंडे यांच्याशी बातचीत केली. यावेळी गावंडे यांनी, “फक्त विदर्भच नाही तर आजुबाजूच्या राज्यांमधूनही काही रुग्ण नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येत आहेत. बऱ्याचदा रुग्णांची परिस्थिती ही गंभीर होत चाललेली असते, अशावेळी त्यांना वेटींगमध्ये ठेवता येत नाही. ऑक्सिजन लावून उपचार करणं गरजेचं असतं. अशावेळी थोडावेळासाठी त्यांच्यावर मिळेत त्या जागेवर उपचार करुन नंतर त्यांना शिफ्ट करण्यात येतं”, अशी माहिती दिली. परंतू एकीकडे रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने वर चढत असताना कोविड-नॉन कोविड रुग्णांना जर एकाच बेडवर उपचार करावे लागणार असतील तर यामधून प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागपुरात परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक सरकारी यंत्रणांना काहीतरी प्रयत्न करण्याची सक्त गरज आहे असंच चित्र सध्या दिसतंय.
दरम्यान राज्य सरकारने कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कोणत्या गोष्टींवर निर्बंध असतील याची यादीच जाहीर केली आहे.
यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:
शेतीविषयक कामे सुरु
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.
कठोर निर्बंध… म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद राहणार पाहा अगदी सविस्तरपणे
आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे
सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच
सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.
ADVERTISEMENT