एकीकडे राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात अनेक पक्षांकडून लॉकडाउनला विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. भाजपासह अनेक विरोधी पक्षांनी सरकारने लॉकडाउन उठवलं नाही तर १ जून पासून आम्ही दुकानं उघडणार असा पवित्रा घेतला आहे. या सर्व विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात खडेबोल सुनावले.
ADVERTISEMENT
“कोरोनाची साथ ही सरकारी योजना किंवा सरकारी कार्यक्रम नाही. त्यामुळे लॉकडाउनला विरोध ही भूमिका थांबवा. आजुबाजूला परिस्थिती पाहा. अनेक घरांमध्ये कोरोनामुळे कर्ती माणसं गेली, अनेक घरांमध्ये तरुणांना प्राण गमवावे लागले. अशावेळी लॉकडाउनला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणं म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्यासारखं आहे. तिसऱ्या लाटेचे निमंत्रक होऊ नका”, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाउनला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांना सुनावलं आहे.
भाषणात मुख्यमंत्र्यांनी भविष्यात येऊ शकणारी तिसरी लाट, या लाटेचा मुलांना असणारा धोका यासंबंधी भाष्य केलं. लहान मुलांना कोविडची लागण झाल्यास त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स स्थापन केला आहे. या फोर्सच्या माध्यमातून राज्यातल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जाणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
आतापर्यंत आपण पहिल्या दोन लाटांना यशस्वीपणे थोपवलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर तिसरी लाट येणारच नाही असा मला विश्वास असल्याचंही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.
ADVERTISEMENT