दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे आफ्रिकन राष्ट्रासह इतर जोखमीच्या (countries at risk) देशांतून आलेल्या आणि येणाऱ्या प्रवाशांवर राज्य सरकारकडून नजर ठेवली जात आहे. गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या नागरिकांचाही शोधही घेतला जात असून, राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती आतापर्यंत सहा प्रवाशी कोरोना पाझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, त्यांना ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालाय की नाही, हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला असून, तो प्रचंड वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित करत जागतिक आरोग्य संघटनेनं जगाला सतर्क केलं आहे.
Covid Omicron Variant : ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात?
या पार्श्वभूमीवर राज्यात केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभागाने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिके व इतर जोखमीच्या यादीतील देशांसह परदेशातून महाराष्ट्रात परतलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. ओमिक्रॉन आढळून आलेल्या आणि युरोपातून परतलेल्या नागरिकांच्या आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचण्या केल्या जात आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार countries at risk अर्थात जोखमीच्या देशातून परतलेल्या प्रवाशांपैकी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात दोन प्रवासी पिंपरी-चिंचवडमधील आहेत. तर मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भायंदर आणि पुणे या ठिकाणी प्रत्येकी एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
Omicron: डेल्टापेक्षा अधिक शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या Omicron व्हेरिएंटपासून कसा कराल बचाव?
सहा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असले, तरी त्यांना ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला आहे की अन्य कोरोना व्हेरिएंटचा, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी (जनुकीय क्रमनिर्धारण) पाठण्यात आले आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगमधूनच त्यांना कोणत्या कोरोनाचा संसर्ग झाला, हे स्पष्ट होणार आहे.
कल्याण-डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मिरा-भाईंदर मनपा आणि पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातील आणि निकटवर्तीयांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत नायजेरियातून आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांचे नमुनेही पुण्यातील एनआयव्ही येथे जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठविण्यात आले आहेत. हे सर्व प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असले तरी काहींना लक्षणं नाहीत, तर काहींना सौम्य लक्षणं असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT