महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्यात यावं यासाठी बॉम्बे हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं गेलं आहे याचिकेत?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केली. राज्यपाल वादग्रस्त वक्तव्यं करून समाजातील शांतता आणि एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आऱोपही याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६१ आणि १५६ अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करण्याची मागणी करत हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कलम ६१ आणि १५६ अंतर्गत राज्यपालांना हटवण्याचा निर्णय घेण्याची या याचिकेत मागणी करण्यात आली आहे.
५ न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करावी. महाराष्ट्रात दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी लोकांना चिथावणी दिल्याबद्दल कलम १५३, १५३ अ, १२४ अ अन्वये फौजदारी कारवाई करावी. राज्यपालांवर फौजदारी कारवाई करण्याची प्रार्थना, लोकसभा आणि राज्य विधीमंडळाच्या अध्यक्षांना करावी. स्वातंत्र्य हे निरपेक्ष नाही, अशी समजही द्यावी. याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव असून त्यांच्या वतीनं अॅड. नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय म्हटलं होतं?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते. नव्या काळातले आदर्श बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आहेत हे वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य
महाविकास आघाडी सरकार राज्यात असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सावित्रीबाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं होतं तेव्हा ज्योतिबा फुले १३ वर्षांचे होते. लग्न झाल्यानंतर पुढे या वयातली मुलं काय करतात हे विचारत ते हसले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.
ADVERTISEMENT