Devendra Fadnavis: ”उद्धव ठाकरेंनी माझं भाषण नीट ऐकलं नाही किंवा ते त्यांना समजलेलं नाही”

मुंबई तक

20 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:52 AM)

नागपूर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस मतं मागताना दिसत असल्याने ‘मोदी युग’ संपले असल्याचा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. भाजपच्या धोरणानुसार ते नवीन नाव शोधतात आणि त्यांच्या नावावर मतं मागतात असा टोलाही उद्धव ठाकरेंनी […]

Mumbaitak
follow google news

नागपूर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस मतं मागताना दिसत असल्याने ‘मोदी युग’ संपले असल्याचा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. भाजपच्या धोरणानुसार ते नवीन नाव शोधतात आणि त्यांच्या नावावर मतं मागतात असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

”मी एवढंच सांगितलं की बाळासाहेबांनी मुंबईसाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न त्यांच्याच लोकांनी चुरचूर केला आहे, पायदळी तुडवला आहे. ते फक्त भ्रष्टाचारामध्ये गुंतून राहिले आणि स्वप्न पूर्ण करू शकले नाही. बाळासाहेबांचे मुंबईसाठीचे ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. जर त्यांनी माझं भाषण नीट ऐकलं असतं तर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलीच नसती. मुंबईमध्ये मोदींवर विश्वास ठेवून लोकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिलं आहे मोदीजींचे फोटो लावून तुम्ही निवडून आला आहात हे कशाला विसरता. जे काय उद्धव ठाकरे म्हणाले असतील आता जनताच त्याला उत्तर देईल.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते नागपूरमध्ये बोलत होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया येण्याच्या एक दिवस अगोदर देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले होते ”आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून बाळ ठाकरेंचे मुंबईसाठीचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेच्या गटाची आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले ”देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मतं मागणं म्हणजे मोदी युग संपल्याची पोचपावती आहे”.

“भाजपच्या धोरणानुसार ते नवीन नाव शोधतात आणि त्यांच्या नावावर मतं मागतात. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा खरा चेहरा दाखवला,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत जनता भाजपला चोख प्रत्युत्तर देईल असे ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी सेना आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘जे स्वप्न मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं, ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. ही आपली जबाबदारी आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले, त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. ते इतके आत्ममग्न, इतके आत्मकेंद्री होते की, स्वतःच्या पलिकडे पाहू शकले नाहीत. मुंबईकरांकडे त्यांनी कधीही बघितलं नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना निवडून आणायचं आहे. जे स्वप्न बाळासाहेबांनी पाहिलं आहे; ते पूर्ण करण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे. त्यासाठी कामाला लागा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

    follow whatsapp